Video: भर कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध पाकिस्तानी रॅपरने फडकवला भारताचा झेंडा, व्हिडीओ चर्चेत
Viral Video: पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमने भारतीय झेंडा फडकावला, ज्यामुळे सोशल मीडियावर नवीन चर्चा सुरू झाली. काहींनी त्याच्या वर्तनाची प्रशंसा केली, तर काहींनी पाकिस्तानचा अपमान केल्याचा आरोप केला. वाद वाढल्यानंतर रॅपरने भारतीय झेंडा फडकावण्याचे कारण सांगितले आहे.

पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमने आपल्या कॉन्सर्टमध्ये भारतीय झेंडा फडकावून खळबळ माजवली आहे. इव्हेंटच्या व्हिडीओमध्ये सिंगर गर्दीतून एका फॅनकडून तिरंगा घेऊन डोक्यावर फडकावताना दिसला. नंतर त्याने झेंडा खांद्यावर ठेवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर लोक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी याला दक्षिण आशियाई एकतेचे उदाहरण म्हणून कौतुक केले तर काही पाकिस्तानातील लोकांनी यावर कठोर टीका केली. तल्हा अंजुमने वाद वाढल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या कलेला कोणत्याही सीमा नाहीत’ असे रॅपर म्हणाला.
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमचा नेपाळमध्ये एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना तल्हाने चाहत्याच्या हातातील भारताचा झेंडा घेतला. तो दोन्ही हाताने फडकवला. त्यानंतर तो झेंडा त्यांने आदराने खांद्यावर ठेवला. त्याचा हा व्हिडीओ पाहून पाकिस्तानी चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Talha Anjum carried an INDIAN flag at his recent show pic.twitter.com/xBnKOt8wk7
— INNOCENT EVIL ⁶𓅓 (@raju_innocentev) November 16, 2025
तल्हा अंजुम काय म्हणाला?
तल्हा अंजुमने सोशल मीडिया अकाऊंट X द्वारे प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘माझ्या हृदयात द्वेषासाठी जागा नाही. माझ्या कलेला कोणत्याही सीमा नाहीत. भारतीय झेंडा फडकावल्याने वाद होत असेल तर होऊ दे. मी पुन्हा तसेच करेन. मीडिया, युद्धप्रेमी सरकार आणि त्यांच्या प्रचाराची मला पर्वा नाही. उर्दू रॅप नेहमी सीमेपलीकडे जाईल.’ त्याच्या विधानामुळे चर्चा आणखी तीव्र झाली, दोन्ही देशांच्या फॅन्सनी राष्ट्रवाद, कलाकारांचे स्वातंत्र्य आणि सीमेपलीकडील सांस्कृतिक तणावावर आपली मते मांडली.
तल्हा अंजुम कोण आहेत?
कराचीत जन्मलेला आणि वाढलेला तल्हा अंजुम पाकिस्तानातील सर्वात महत्त्वाचा हिप-हॉप सिंगर्सपैकी एक आहे. २०१२ मध्ये त्याने तल्हा युनूससोबत उर्दू रॅप जोडी ‘यंग स्टनर्स’ सुरू केली होती. या जोडीला ‘बर्गर-ए-कराची’ने लोकप्रियता मिळवून दिली. शेवटी ते दक्षिण आशिया रॅप सर्कलमध्ये घराघरात ओळखले जाऊ लागले. तल्हा अंजुमने अभिनयातही पदार्पण केले आहे. २०२४ मध्ये त्याने ‘कट्टर कराची’ या फीचर फिल्ममध्ये अभिनय केला होता. त्याच्या इंस्टाग्रामवर ३ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मात्र, अनेक पाकिस्तानी कलाकारांप्रमाणेच त्याच्या प्रोफाइल भारतात बंदी घालण्यात आली आहे.
