तेच मला सोडून गेले अन् दुसरं लग्न..; पवन कल्याण यांच्या पूर्व पत्नीची कमेंट चर्चेत
दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांना लोकसभा निवडणुकीत दमदार यश मिळालं. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करून त्यांच्या पूर्व पत्नीला ट्रोल केलं. थोडं संयम दाखवलं असतं तर बरं झालं असं, असं एकाने म्हटलंय. त्यावर रेणु देसाईंनी आता उत्तर दिलं आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड यश मिळालं. या निवडणुकीनंतर त्यांना आंध्र प्रदेशचं उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. मात्र या विजयानंतर पवन कल्याण यांच्या पूर्व पत्नी रेणुका देसाई उर्फ रेणु देसाई यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. रेणु यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर एका चाहत्याने पवन कल्याण यांच्यासोबतच्या नात्यावरून कमेंट केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. रेणु यांनी वैवाहिक आयुष्यात थोडा आणखी संयम आणि समजुतदारपणा दाखवायला पाहिजे होता, कारण पवन कल्याण हा देवमाणूस आहे, असं त्या चाहत्याने लिहिलं होतं. त्यावर आता रेणु देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रेणु देसाई यांनी म्हटलंय की पवन कल्याण यांनी त्यांच्यासोबतचं नातं संपवून दुसरं लग्न केलं. अशा कमेंट्स वाचून त्रास होत असल्याचं व्यक्त करत त्यांनी लोकांना अशा प्रकारची इतरांना दुखावणारी वक्तव्ये न करण्याचं आवाहन केलं आहे,
काय होती चाहत्याची कमेंट?
‘वहिनी, तुम्ही थोडं आणखी संयम बाळगायला हवं होतं. तुम्ही एका देवमाणसाला चुकीचं समजलात. कदाचित आता तुम्हाला त्या व्यक्तीचं महत्त्व समजलं असेल. पण मुलं पवन कल्याण यांच्यासोबत असल्याचं मला समाधान आहे’, अशी ही कमेंट होती. त्यावर उत्तर देताना रेणु यांनी लिहिलं, ‘जर तुमच्याकडे काडीमात्र बुद्धिमत्ता असती तर तुम्ही अशा प्रकारची मूर्ख टिप्पणी केली नसती. त्यानेच मला सोडून दुसरं लग्न केलंय. मी त्याला सोडलं नव्हतं. कृपा करून अशा कमेंट्स करणं टाळा. त्याने फक्त मला त्रास होतो.’




Orey 😂😂🤣 pic.twitter.com/O9ndiv5ZCr
— Dr. SÆ (@Sai__018) June 15, 2024
यानंतर रेणु देसाई यांनी कमेंट्स डिलिट करून त्यांच्या पोस्टवरील कमेंट सेक्शन ‘डिसेबल्ड’ केलं, जेणेकरून कोणी त्यावर कमेंट करू शकणार नाही. रेणु देसाई आणि पवन कल्याण यांनी 2009 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर 2012 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना अकिरा हा मुलगा आणि आध्या नावाची मुलगी आहे. मुलगा अकिरा हा त्याच्या वडिलांच्या राजकीय प्रवासात त्यांना सक्रियपणे पाठिंबा देतोय. तर अलीकडेच आध्या ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या वडिलांच्या भेटीत सहभागी झाली होती.
रेणु देसाई यांच्याशी घटस्फोटानंतर पवन कल्याण यांनी रशियन मॉडेल ॲना लेझनेवाशी तिसरं लग्न केलं. तर रेणु देसाई यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांनी 1997 मध्ये नंदिनीशी पहिलं लग्न केलं होतं. विवाहित असताना ते रेणु देसाई यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा आरोप नंदिनी यांनी केला होता.