साईबाबा साकारलेल्या सुधीर दळवींच्या मदतीला सरसावले शिर्डीकर
अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता शिर्डीकरच सुधीर यांच्या मदतीला सरसावले आहेत.

‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटात साईबाबांची अजरामर भूमिका साकारणारे अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सुधीर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. त्यानंतर आता शिर्डीकर त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. दळवी यांच्या उपचारासाठी शिर्डी ग्रामस्थांसह विखे परिवाराने लाखो रुपयांची मदत दिली आहे. 86 वर्षीय सुधीर दळवी हे सेप्सिस या गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 8 ऑक्टोबरपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावरील उपचाराचा खर्च 15 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परंतु इतके पैसे नसल्याने कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली.
सुधीर दळवी यांच्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची मागणी होताच अनेकजण मदतीसाठी पुढे सरसारवले आहेत. 2025 च्या श्रीरामनवमी उत्सवात शिल्लक राहिलेल्या वर्गणीतील चार लाख आणि आणखी 1 लाख अशी पाच लाखांची मदत शिर्डीकरांनी केली आहे. तर विखे परिवारदेखील दळवी यांच्या उपचारासाठी दीड लाख रुपये मदत देणार आहे. इतकंच नव्हे तर सुधीर दळवी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी साईंचरणी प्रार्थना केली आहे. दरम्यान सुधीर दळवी यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानं देखील तत्काळ दखल घेतली आहे. मुख्यमंत्री मेडिकल रिलिफ फंडातून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर सहानीनेही आर्थिक मदत केली आहे. ‘आर्थिक मदत पाठवली आहे. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा’, अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर लिहिली होती.
सुधीर दळवी हे चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी 1977 मध्ये ‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारली होती. या भूमिकेनं त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. याशिवाय ते रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत ऋषी वसिष्ठ यांच्या भूमिकेत दिसले. त्यांनी ‘जुनून’ आणि ‘चांदनी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. त्यांना 2006 मध्ये शेवटचं पडद्यावर पाहिलं गेलंय. ‘हुए ना हमारे’ या मालिकेत ते झळकले होते.
