भावाच्या आत्महत्येविषयी पहिल्यांदाच पूजा बेदी व्यक्त; सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं होतं?
अभिनेत्री पूजा बेदीचा भाऊ सिद्धार्थने वयाच्या पंचविसाव्या वर्षी आपलं आयुष्य संपवलं होतं. त्याला स्किझोफ्रेनियाचं निदान झालं होतं. आपल्या भावाच्या आत्महत्येविषयी पूजा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पूजाचा भाऊ सिद्धार्थ बेदीने वयाच्या 25 व्या वर्षी आपलं आयुष्य संपवलं होतं. ही घटना माझ्या आयुष्यातील सर्वांत धक्कादायक होती, असं पूजाने सांगितलं. त्याचवेळी पूजा गरोदर होती. पूजाचा भाऊ सिद्धार्थला स्किझोफ्रेनियाचं निदान झालं होतं. सिद्धार्थ हा कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांचा मुलगा होता.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, “त्याच्या आत्महत्येबद्दल समजताच मी पूर्णपणे खचले होते. त्यावेळी मी भीतीने थरथर कापत होती. मी गरोदर असल्याने पोटातील बाळाचीही मला काळजी घ्यायची होती आणि त्याचा परिणाम बाळावर होऊ नये, या भीतीने मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या गर्भात वाढणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होऊन गर्भपात होऊ नये, अशी भीती मला सतावत होती. मी स्वत:लाच सकारात्मक राहण्यासाठी समजावत होती. ती घटना जेव्हा घडली, तेव्हा वडील कबीर बेदी अमेरिकेत सिद्धार्थसोबतच होते. त्यांनी डोळ्यांसमोर मुलाच्या पार्थिवाला पाहिलं होतं. त्या क्षणाची मी कल्पनाही करू शकत नाही. कोणत्याही आईवडिलांसाठी ते असह्य असतं.”
View this post on Instagram
भाऊ सिद्धार्थने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिल्याचा खुलासा पूजा बेदीने केला. त्या चिठ्ठीत कुटुंबीयांसाठी अनेक भावूक गोष्टी लिहिल्या होत्या. त्यात पूजा, अलाया आणि त्यांच्या आईसाठी खास संदेश होता. “ती घटना टाळता येऊ शकली असती. परंतु त्याने आपलं आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्याने आणखी थोडी हिंमत दाखवली असती तर तो जगू शकला असता. माझ्या भावाच्या मानसिक स्थितीला डॉक्टर बराच काळ समजूच शकले नव्हते. आधी डिप्रेशन म्हटलं गेलं, त्यानंतर बायपोलर डिसॉर्डर सांगितलं. स्किझोफ्रेनियाच्या निदानाला बराच वेळ लागला”, असं तिने सांगितलं.
“माझ्यावर काय परिस्थिती ओढावली होती, याची कल्पना तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. अखेर मी ही लढाई जिंकू शकलो नाही आणि माझ्या आयुष्यातील ही कदाचित सर्वांत मोठी शोकांतिक आहे,” अशा शब्दांत कबीर बेदी व्यक्त झाले होते. 1997 मध्ये सिद्धार्थने आत्महत्या केली होती.
