पतीचा सूड घेण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्रीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांवर विवाहबाह्य संबंधाचा ठपका ठेवण्यात आला. काहींनी उघडपणे या गोष्टी मान्य केल्या, तर काहींनी त्यावर मौन बाळगणं पसंत केलं. अशाच एका अभिनेत्रीने पतीचा सूड घेण्यासाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं होतं.

पतीचा सूड घेण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्रीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर
Poonam Dhillon
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 18, 2025 | 3:33 PM

अभिनेत्री पूनम ढिल्लोंने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ‘मिस यंग इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब जिंकून ती रातोरात प्रकाशझोतात आली होती. यश चोप्रा दिग्दर्शित ‘त्रिशुल’ या चित्रपटातून तिने अभिनयातील करिअरची सुरुवात केली. आजपर्यंतच्या करिअरमध्ये तिने जवळपास 80 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पूनम ढिल्लोंला तिच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळालं असलं तरी तिचं खासगी आयुष्य बऱ्याच कारणांमुळे वादात सापडलं होतं.

‘त्रिशूल’ या चित्रपटाच्या यशानंतर पूनमने ‘नूरी’ हा चित्रपट साइन केला होता. या चित्रपटात काम करताना दिग्दर्शक रमेश तलवार आणि पूनम ढिल्लों यांच्यात चांगली मैत्री झाली होती. हळूहळू इंडस्ट्रीत या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. इतकंच नव्हे तर या दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याच्याही चर्चा होत्या. चित्रपटांच्या ऑफर्स गमावण्याच्या भीतीने पूनमने या सर्व गोष्टी लपवून ठेवल्याचं म्हटलं गेलं. रमेश यांनी तिच्यासाठी जुहूमध्ये एक बंगलादेखील खरेदी केला होता. परंतु जेव्हा पूनम आणि यश चोप्रा यांच्याबद्दल बरंच काही वर्तमानपत्रात लिहिलं जाऊ लागलं, तेव्हा रमेश तलवाल यांच्यासोबतचं तिचं नातं संपुष्टात आल्याचं म्हटलं गेलं.

1980 च्या दशकात करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना विवाहित दिग्दर्शक राज सिप्पी यांच्या प्रेमात पूनम पडली होती. संपूर्ण इंडस्ट्रीत या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. पूनमला राज यांच्यासोबत लग्न करायचं होतं, परंतु राज यांना त्यांचं कुटुंब सोडायचं नव्हतं. त्यामुळे काही महिन्यांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. अखेर 1988 मध्ये तिने निर्माता अशोक ठकेरियाशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्नानंतर पूनमने अभिनयातून ब्रेक घेतला होता.

लग्नाच्या काही वर्षांनंतर पूनम आणि अशोक यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ लागल्या. 1994 मध्ये अशोक यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत जोरदार चर्चा होऊ लागली होती. त्यावेळी पूनमसुद्धा सार्वजनिकरित्या याबद्दल व्यक्त झाली होती. अखेर पतीचा सूड घेण्यासाठी किंवा त्याला धडा शिकवण्यासाठी पूनमसुद्धा हाँगकाँगमधील बिझनेसमन किकूला डेट करू लागली होती. किकू पूनमला भेटायला अनेकदा भारतात यायचा आणि काही वेळा पूनमसुद्धा त्याच्यासाठी हाँगकाँगला जायची. सततची भांडणं, अविश्वास, फसवणूक, अस्थिरता या सर्व गोष्टींमुळे पूनम आणि अशोक यांच्या वैवाहिक आयुष्यात फूट पडली. 1997 मध्ये हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले.