मी लिहिलं होतं तमाशा करू नको..; लेखकाने मागितली शशांक केतकरची जाहीर माफी
अभिनेता शशांक केतकरने काही दिवसांपूर्वी व्हिडीओ पोस्ट करत निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. यानंतर लेखक प्रशांत लोके यांनी शशांकच्या या कृतीला चुकीचं ठरवलं होतं. आता त्यांनीच शशांकती जाहीर माफी मागितली आहे.

मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरने काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक-निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत चॅटचे स्क्रीनशॉट पोस्ट केले होते. ‘हे मन बावरे’ मालिका संपून कित्येक वर्षे उलटूनही मंदार यांनी जवळपास पाच लाख रुपये अद्याप दिले नसल्याची तक्रार शशांकने केली होती. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याची साथ दिली होती. परंतु त्याच मालिकेत काम केलेली अभिनेत्री माधवी जुवेकरचा पती आणि लेखक प्रशांक लोक यांनी शशांकवर टीका केली होती. ‘असा तमाशा करायला नको होता’ असं त्याने म्हटलं होतं. आता फेसबुकवर आणखी एक पोस्ट लिहित प्रशांत यांनी जाहीर माफी मागितली आहे.
‘चार दिवसांपूर्वी माझ्याकडून एक चूक झाली. शशांक केतकरचे मंदार देवस्थळी याच्याकडे पाच लाख बाकी आहेत. माझ्या बायकोचेही साडेतीन लाख बाकी आहेत. शशांकने ती पोस्ट टाकली तेव्हा, मी लिहिलं होतं तमाशा करू नको. तर मी आधी शशांकची माफी मागतो, मला एक म्हणायचं आहे, की शक्यतो सर्व निर्माते कलाकारांचे टेक्निशियनचे पैसे देतात. फार कमी देऊ शकत नाही आणि त्यांनी ते द्यावं. कारण माझ्या माहितीनुसार चॅनल त्यांना सर्व पैसे देतं. मग त्यांनी कलाकारांचे पैसे द्यावेच द्यावेत. नाहीतर निर्मितीच्या क्षेत्रात येऊ नये. मी आताही सांगतो, मंदारने त्या पैशांचं काय केलं माहित नाही. त्याला पुन्हा निर्माता करावा की नाही हा चॅनलचा प्रश्न. पण सगळ्यांचे पैसे हक्काने देणाऱ्या निर्मात्यांवर मी बोलून अन्याय केला,’ असं त्यांनी लिहिलं.
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘लोक मला म्हणाले तुझ्या बायकोला नोकरी आहे. तिला काही फरक पडत नाही. तर फरक पडतो. पहाटे उशिरापर्यंत शूटिंग करून ती शार्प नऊला ऑफिसमध्ये पोहोचते, कष्टाचे पैसे सगळ्यांना मिळावेत आणि पैसे न देणाऱ्या निर्मात्याला चॅनलने मालिका देऊ नये. मंदार देवस्थळी आधी तुम्ही रेग्युलर पैसे द्यायचात. नाहीतर आपण पैसे नाही दिले तर कलाकारांचं काही बिघडत नाही असा पायंडा पडेल. तुम्ही पैसे न दिल्यामुळे लोकांचे खूप प्रॉब्लेम झाले. पण हे योग्य नाही. शशांकशी माझं काही शत्रुत्व नाही. त्याला वाईट वाटलं असेलच, मी त्याची माफी मागतो. मी अल्टरनेट डे काहीतरी गोंधळ घालतच असतो. जमल्यास मला माफ करा पोस्ट करायची मला घाई असते आणि ती कधीतरी अंगाशी येते. तरी बरं मला माफी मागायची लाज वाटत नाही. चुकलं तर मी माफी मागतोच.’
