‘..अन्यथा माझा काली अवतार पहाल’; प्रिती झिंटाने कशावरून दिला कडक इशारा?
अभिनेत्री प्रिती झिंटाने ठणकावून सांगितलं आहे. अन्यथा माझा काली अवतार पहाल, असा कडक इशाराच तिने दिला आहे. एक्स अकाऊंटवर चाहत्यांशी संवाद साधताना तिने हे स्पष्ट केलंय. प्रितीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांच्या फोटोग्राफीबद्दल पापाराझींना आणि फोटोग्राफर्सना सक्त ताकीद दिली आहे. तर काहींनी नम्रपणे विनंती करत लहान मुलांचे फोटो क्लिक न करण्यास सांगितलं आहे. यामध्ये अनुष्का शर्मा-विराट कोहली, राणी मुखर्जी, रणवीर सिंग-दीपिका पादुकोण यांचा समावेश असून त्या यादीत आता अभिनेत्री प्रिती झिंटाचाही समावेश झाला आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील ‘आस्क मी एनिथिंग’ (AMA) सेशनदरम्यान प्रितीने तिच्या मुलांच्या प्रायव्हसीबद्दल ठणकावून सांगितलं आहे. प्रितीने जीन गुडइनफशी लग्न केलं असून 2021 मध्ये ती सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई बनली. जय आणि जिया अशी तिच्या मुलांची नावं आहेत. परवानगीशिवाय त्यांचे फोटो क्लिक करणाऱ्यांना तिने कडक संदेश दिला आहे.
‘मी खूप आनंदी व्यक्तीमत्त्व असणारी आहे, परंतु परवानगीशिवाय तुम्ही माझ्या मुलांचे फोटो क्लिक केल्यास तुम्ही माझा काली अवतार पहाल. माझ्या परवानगीशिवाय त्यांचे व्हिडीओ काढू नका’, असा इशाराच तिने दिला आहे. इतर काही सेलिब्रिटींप्रमाणेच प्रितीनेही तिच्या मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवलं आहे. प्रश्नोत्तरांदरम्यान एका युजरने तिच्या चाहत्यांना माहीत नसलेली गोष्ट शेअर करण्यास सांगितली. त्यावर प्रिती म्हणाली की, तिला मंदिरात, एअरपोर्टवर, बाथरुममध्ये आणि सुरक्षा तपासणीदरम्यान फोटो काढणं अजिबात आवडत नाही. “माझ्या परवानगीशिवाय व्हिडीओ काढू नका. हे खूपच त्रासदायक आहे. फक्त मला नम्रपणे आधी विचारा आणि माझ्या मुलांना एकटं सोडा”, असं म्हणत तिने हात जोडण्याचा इमोजी पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
प्रितीने 2016 मध्ये फायनान्शियअल एनालिस्ट जीन गुडइनफशी लग्न केलं. त्यानंतर 11 नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसीद्वारे तिला जुळी मुलं झाली. सोशल मीडियावर ती अनेकदा तिच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. परंतु यामध्ये त्यांचा चेहरा दिसणार नाही, याची काळजी ती आवर्जून घेते. जोपर्यंत मुलं मोठी होत नाहीत आणि त्यांच्या फोटोग्राफीबद्दल ते स्वत: निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत या निर्णयावर ठाम राहणार असल्याचं तिने स्पष्ट केलंय. प्रिती तिच्या खासगी आयुष्याबद्दलही सार्वजनिकरित्या फारशी मोकळेपणे व्यक्त होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक आयुष्यात माध्यमांनीही फार ढवळाढवळ करू नये, असं तिचं मत आहे.
