Priya Marathe: तुम्ही मराठी बोलणं बंद करा; सुशांत सिंहला उत्तर देत प्रिया मराठेने वेधले होते लक्ष, नेमकं काय घडलं होतं वाचा
Priya Marathe Death: 'पवित्र रिश्ता' या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपुतने एकत्र काम केलं होतं. पण आज हे दोन्ही कलाकार या जगात नाहीत. सुशांतच्या निधनावर प्रिया काय म्हणाली होती चला जाणून घेऊया...

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले आहे. वयाच्या 38व्या वर्षी कर्करोगामुळे तिचे निधन झाले आहे. तिने ‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने देखील काम केले होते. सुशांतने वयाच्या 34व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. या दोन्ही कलाकारांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला.
सुशांतच्या मृत्यूवर प्रियाने दिली होती प्रतिक्रिया
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या निधनावर प्रतिक्रिया देत प्रिया म्हणाली होती की, “दुर्दैवाने,आमच्या दोघांचा जवळजवळ एक वर्ष संपर्क नव्हता. तो बॉलिवूडमध्ये गेल्यानंतर आमचा संपर्क थोडा तुटला होता, पण पवित्र रिश्तामध्ये एकत्र वेळ घालवल्यापासून त्याला ओळखल्याने,तो केंद्रित, समर्पित अभिनेता आणि खूप चांगला सह-कलाकार होता.आम्ही एकत्र खूप मजा करायचो.पवित्र रिश्तामधील संपूर्ण कलाकारांना धक्का बसला. मी अनेक लोकांशी बोलले. आम्हाला वाईट वाटतले. कारण हे पूर्णपणे अनपेक्षित होते आणि त्यामुळे आम्ही सर्वजण हैराण झालो आहोत.”
वाचा: प्रियाचा अवघ्या 38व्या वर्षी मृत्यू, अगदी कमी वयात कर्करोग का होतो? काय आहेत लक्षणे?
‘मराठीत बोलणे बंद करा’
पुढे प्रियाने सुशांतसोबत काम करण्याचा गोड अनुभव सांगितला होता. “मला वाटते, सर्वात गोड गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा मी, अंकिता (लोखंडे), प्रार्थना, सविता ताई आम्ही सगळे मराठीत बोलायचो. कारण आम्ही सर्व महाराष्ट्रातील होतो आणि जेव्हा तो यायचा तेव्हा तो असे म्हणायचा, ‘मराठीत बोलणे बंद करा, मला काहीच समजत नाही. म्हणून, आम्ही त्याला तूही मराठीत बोल, मराठी शिक म्हणायचो. म्हणून त्याला ते खूप आवडायचे आणि त्याला काही महाराष्ट्रातील पदार्थही आवडायचे.
प्रिया ही सुशांतच्या आठवणीत भावूक झाली होती. आता प्रियाच्या निधनानंतर चाहत्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनेकांनी प्रिया अतिशय गोड अभिनेत्री होती, तिचे सगळ्यांसोबत खूप चांगले नाते होते असे म्हटले आहे.
