पत्नीने किडनी देऊन वाचवले अभिनेत्याचे प्राण; दोन्ही किडन्या निकामी होण्यामागचं कारण समोर
प्रसिद्ध दाक्षिणात्य विनोदी कलाकार पंच प्रसादने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आरोग्याच्या समस्यांविषयी सांगितलं. मूत्रपिंडाशी संबंधित समस्या, डाएलिसिसचा त्रास, त्यादरम्यान आलेले आत्महत्येचे विचार, मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण या सर्व वैयक्तिक संघर्षाबद्दल तो व्यक्त झाला.

प्रसिद्ध दाक्षिणात्य विनोदी अभिनेता पंच प्रसादवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला जीवनदान मिळालं आहे. पंच प्रसादच्या पत्नीनेच त्याच्यासाठी आपली एक किडनी दान केली. आयुष्यातील या कठीण काळानंतर तो पुन्हा एकदा कारकिर्दीत एक नवी झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “देवाने मला माझ्या आयुष्यात अनेक अडचणी दिल्या आहेत. मला व्यावसायिक यश मिळूनदेखील माझ्या आरोग्याने साथ दिली नाही”, असं तो म्हणाला. यावेळी त्याने किडनी निकामी होण्याचं कारणसुद्धा सांगितलं. उच्च रक्तदाबामुळे किडनी निकामी झाल्याचं त्याने स्पष्ट केलं. ज्याबद्दल त्याला आधी माहीत नव्हतं.
लग्नानंतर दोन्ही किडन्या निकामी
“लग्नानंतर एकेदिवशी माझ्या नाकातून रक्त वाहू लागलं होतं. तेव्हा वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर मला किडनीची समस्या असल्याचं कळलं. त्यावेळी माझ्या क्रिएटिनिनची पातळी जास्त होती आणि तेव्हापासून मी डाएलिसिसवर होतो. डाएलिसिस ही माझ्यासाठी एक दिनचर्याच बनली होती. कधीकधी मला स्टेजवर परफॉर्म करण्याआधीही डाएलिसिस करावं लागायचं. आरोग्याच्या या गंभीर समस्या आणि शारीरिक वेदनांमुळे माझ्या मनात त्यावेळी आत्महत्येचाही विचार आला होता”, असा धक्कादायक खुलासा त्याने या मुलाखतीत केला.
अशा कठीण परिस्थितीत अभिनेते नागाबाबू यांनी खूप मदत केल्याचं त्याने सांगितलं. “नागाबाबू यांनी फोन करून मला खूप धीर दिला. माझ्या ऑपरेशनच्या खर्चासाठीही त्यांनी निधी उभारला होता. त्यांचे आणि त्यांच्या टीमचे मी खूप आभार मानतो. श्रीनू आणि रामप्रसाद या सहकाऱ्यांनीही मला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते आर्थिक मदतीपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.”
पत्नीने दिलं जीवनदान
प्रसादला त्याच्या पत्नीनेच किडनी दान केली. 2023 मध्ये त्याच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. तत्कालीन मंत्री रोजा यांच्या पुढाकाराने तत्कालीन सरकारने पंच प्रसादच्या रुग्णालयाचा खर्च उचलला होता. मुख्यमंत्री सहायता निधीतून पंच प्रसादला वैद्यकीय मदत देण्यात आली होती. “माझी पत्नी एक अद्भुत व्यक्ती आहे. जर मी तिच्या जागी असतो तर कदाचित असा धोका पत्करला नसता. ती कधीही तिचं दु:ख व्यक्त करत नाही. तिच्यामुळे मला माझ्याही आजारपणाचा विसर पडतो. या कठीण काळात कलाविश्वातील अनेक कलाकारांनी माझी मदत केली. काहींनी तर माझ्या कुटुंबातील सदस्यांपेक्षा अधिक मानसिक आणि आर्थिक मदत केली”, असं त्याने सांगितलं.
चाहत्यांना सल्ला
यावेळी पंच प्रसादने चाहत्यांना आरोग्याविषयी मोलाचा सल्लासुद्धा दिला. “रक्तदाब हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्याकडे अजिताब दुर्लक्ष करू नका. कारण ते नकळत तुमच्या किडनी आणि हृदयसारख्या अवयवांना नुकसान पोहोचवू शकतं. म्हणून रक्तदाबाच्या चाचण्या नियमितपणे कराव्यात. औषधांसोबतच डॉक्टरांच्या सूचनांनुसार जीवनशैलीत बदल करावेत. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी नियमित योगासनं आणि प्राणायामदेखील करावा”, असा सल्ला त्याने दिला.
