‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चे शोज हाऊसफुल; 2 दिवसांत झाली इतकी कमाई
31 ऑक्टोबर रोजी महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडकेनं मुख्य भूमिका साकारली आहे. गेल्या दोन दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली, ते जाणून घेऊयात..

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आणि त्यांचा न्यायप्रिय स्वभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके आणि इतर कलाकारांचं अभिनय पाहून अनेक कलाकार आणि प्रेक्षक त्यांचं कौतुक करत आहेत. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेनं पहावा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा केलंय. शुक्रवारी आणि शनिवारी या चित्रपटाची कमाईसुद्धा सकारात्मक झाली आहे. येत्या काळात माऊथ पब्लिसिटीचाही या चित्रपटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
‘सॅकनिल्क’ या बॉक्स ऑफिस कलेक्शन ट्रॅकर वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 19 लाख रुपयांची कमाई केली. तर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 34 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे दोन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 53 लाख रुपयांवर पोहोचला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कमाईत चांगली वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मितेचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरतात आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी लढतात अशी या चित्रपटाची रोचक कल्पना आहे. यामध्ये सिद्धार्थ बोडकेनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री आणि सयाजी शिंदे हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे.
“शेतकरी आत्महत्येचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या विषयाचा सखोल अभ्यास करताना मला जाणवलं की, यावर काहीतरी करायलाच हवं. समाजासमोर हा प्रश्न मांडायला हवा. सध्याच्या काळातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून महाराज किती संतप्त होऊ शकतात, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाचा आहे”, अशी प्रतिक्रिया मांजरेकरांनी दिली आहे.
