Rajpal Yadav : माझ्या स्वत:चाच तमाशा झालाय… राजपाल यादव कोर्टात रडवेला… किती कोटी देण्यास तयार?
कोट्यवधी रुपयांच्या चेक बाउंस प्रकरणात सुप्रीम कोर्टने राजपाल यादव यांना दोन आठवडे मुदत दिली आहे. कोर्टसमोर राजपाल यादवच्या वेदना व्यक्त झाल्या, तो इमोशनल झाला होता.

चेक बाऊन्स प्रकरणात अडकलेला बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याच्या केसमध्ये एक नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव बुधवारी सर्वोच्च न्यायालयात हजर झाला. त्याच्या हातात 1.15 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट होता. तर उर्वरित 85 लाख रुपये जमा करण्यासाठी त्यांनी 13 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मागितली आहे. सुनावणीदरम्यान राजपाल यादव याने न्यायालयासमोर आपल्या आर्थिक अडचणी आणि ‘अता पता लापता’ या चित्रपटामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीबद्दल माहिती दिली. यावेळी तो काहीसा भावूकही झाल्याचं दिसून आलं..
‘लोकांचं मनोरंजन करताना माझं आयुष्यच नाटक बनलं’
राजपाल यादवने न्यायालयात सांगितले की, चित्रपटाच्या निर्मितीमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर पैसे अडकले आहेत. ‘अता पता लापता’ या चित्रपटामुळे आपले सुमारे 17 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्याने नमूद केलं. गेल्या 13 वर्षांपासून काही लोकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण केले आणि स्टे ऑर्डर घेतल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले, असा दावा त्याने केला. एका बाजूला त्याच्यावर सुमारे 5 कोटी रुपयांच्या रकमेचा वाद होता, तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणामुळे त्यांचे तब्बल 22 कोटी रुपयांचे नुकसान झाल, असं राजपालने नमूद केलं.
आपली व्यथा मांडताना तो म्हणाला की, सुरुवातीला आपल्याला मोठा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती म्हणून संबोधण्यात आले, मात्र नंतर कोर्टात खेचण्याची धमकी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून आपण लोकांचे मनोरंजन करत आलो आहोत, मात्र आता स्वतःचं आयुष्यच एका नाटकाचा भाग बनल्यासारखे वाटत आहे. राजपाल यादव याने पुढे सांगितलं की, त्याने आतापर्यंत जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि या वादामुळे त्याच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. मात्र आता त्यांना पुन्हा काम मिळू लागले असून, संबंधित व्यक्तींचे पैसे परत करण्याची आपली तयारी असल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले.
CJI सूर्यकांत यांनी केली मिश्कील टिप्पणी
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राजपाल यादवशी संवाद साधताना मिश्कील टिप्पणी केली. त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याचे पैसेही अचानक गायब झाल्याचे त्यांनी गंमतीने म्हटले. सध्या कोणता चित्रपट किंवा वेब सीरिज करत आहात का, की फक्त न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहेत, असा प्रश्नही CJI यांनी राजपाल यादवला विचारला. यानंतर न्यायालयाने राजपाल यादवला यापुढे चांगले चित्रपट करण्याचा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहण्याचा सल्ला दिला.
उर्वरित 85 लाख रुपये भरण्यासाठी मुदत
या प्रकरणाची सुनावणी CJI सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती वी. मोहना यांच्या खंडपीठासमोर झाली. राजपाल यादव याने 1.15 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट न्यायालयात सादर केला असून, उर्वरित 85 लाख रुपये जमा करण्यासाठी 13 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मागितली आहे. न्यायालयाने त्यांना पैसे परत करण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणांमधून निर्माण झाले आहे. या प्रकरणांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव याला दोषी ठरवत प्रत्येक प्रकरणात तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. मागील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादव याच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतरही संबंधित रक्कम जमा करण्यात आलेली नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
तक्रारदाराला काही रक्कम परत मिळावी यासाठीच न्यायालय राजपाल यादव याला आणखी संधी देत आहे. अन्यथा त्याच्या शिक्षेविरोधातील याचिका फेटाळण्याचा न्यायालयाचा विचार होता, असं CJI सूर्यकांत यांनी यावेळी स्पष्ट केले होतं.
