21 वर्षांनी मोठ्या अजय देवगणसोबत अभिनेत्रीचा रोमँटिक सीन; कॅमेरा ऑन होताच..
नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा होती. वडिलांच्या वयाचा बॉयफ्रेंड दाखवल्याने या चित्रपटावर काहींनी टीकासुद्धा केली होती. यामध्ये अजय देवगणसोबत त्याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान अभिनेत्रीची मुख्य भूमिका आहे.

एखाद्या चित्रपटात किंवा वेब सीरिजमध्ये हिरो आणि हिरोइन यांच्या वयात मोठं अंतर असणं किंवा दाखवणं ही काही आता नवीन गोष्ट राहिली नाही. सलमान खान, शाहरुख खान यांसारखे मोठे कलाकारसुद्धा वयाने अत्यंत लहान अभिनेत्रींसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसतात. इतकंच काय तर सध्या गाजत असलेल्या ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंहने त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला. खऱ्या आयुष्यातही कित्येक जोडीदारांच्या वयात मोठं अंतर असल्याची अनेक उदाहरणं पहायला मिळतात. अशीच एक जोडी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटात दिसली. ही जोडी होती अभिनेता अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहची. एकीकडे अजय 56 वर्षांचा आहे तर रकुल 35 वर्षांची आहे. 21 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी रकुल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.
‘अजेंडा आज तक 2025’मध्ये रकुल म्हणाली, “आमच्या चित्रपटाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात मला मिळालेली भूमिकासुद्धा समाधानकारक होती. खूप कमी चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना अशा भूमिका मिळतात. मला आशा आहे की भविष्यातही मला अशा भूमिका साकारायला मिळतील. खऱ्या आयुष्यात मी अशा अनेक जोडप्यांना पाहिलंय, ज्यांच्या वयात लक्षणीय अंतर आहे. अशा आशयाचा चित्रपट बनवणं कठीण असतं. आम्ही अशा नात्यांचा सहजतेने स्वीकार करणारे लोक यात दाखवले नाहीत. त्या नात्यांचा परिणामसुद्धा आम्ही त्यात अधोरेखित केला आहे.”
View this post on Instagram
अजयसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याच्या अनुभवाविषयी ती पुढे म्हणाली, “अभिनय हा अत्यंत विचित्र व्यवसाय आहे. अॅक्शन आणि कटदरम्यान तुम्ही फार वेगळे वागता. मलाही ते माहीत नाही की हा बदल कसा होतो. आम्ही एखाद्या रडण्याच्या सीनपूर्वी सेटवर हसत असतो. कधी कधी सेटवर खूप गोंधळ असतो. पण कॅमेरा ऑन होताच तुम्ही लगेच बदलता. अजय सर माझ्यासाठी नेहमीच सर राहतील. मी त्यांना पाहतच लहानाची मोठी झाली. ते सुपरस्टार आहेत. मला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहील.”
हिरो आणि हिरोईन यांच्यामधील वयात अंतर दाखवल्याबद्दल अनेकदा चित्रपटांवर आणि कलाकारांवर टीका होते. परंतु अशा चित्रपटांकडे समाजाचं प्रतिबिंब म्हणून नव्हे तर मनोरंजनाच्या उद्देशाने पाहिलं पाहिजे, असं रकुल सांगते. “अॅक्शन चित्रपट पाहिल्यानंतर आपण रस्त्यावर लोकांना गोळ्या घालण्यास सुरुवात करत नाही. काही चित्रपट प्रभावासाठी बनवले जातात, तर काही मनोरंजनासाठी,” असं मत तिने मांडलं.
