रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचं निधन; रामायणातील लक्ष्मणाकडून शोक व्यक्त
निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचं निधन झालं आहे. 'रामायण'मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली आहे.

‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. वृद्धापकाळातील समस्यांचा ते सामना करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेम सागर यांच्या निधनावर ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रेम सागर यांचा फोटो शेअर करत सुनील यांनी लिहिलं, ‘ही अत्यंत दु:खद बातमी सांगताना मला खूप दु:ख होतंय. रामानंद सागरजी यांचे पुत्र प्रेम सागर यांचं निधन झालं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना हा कठीण काळ सहन करण्याची शक्ती देवो.’
रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम हे निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर होते. जुहूमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. प्रेम सागर हे 1968 मध्ये एफटीआयआयमधून ग्रॅज्युएट झाले होते. त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘चरस’ आणि ‘ललकार’ यांसारखे चित्रपट बनवले. याशिवाय त्यांनी बऱ्याच मालिकांचीही निर्मिती केली. त्यापैकी ‘विक्रम और वेताल’ ही मालिका 1985 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेची त्यांनी निर्मिती केली होती आणि त्याचसोबत त्याच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली होती. प्रेम सागर हे रामानंद सागर फाऊंडेशनची बरीच कामं पहायचे. या स्वयंसेवी संस्थे अंतर्गत अनेक परोपकारी कामं केली जातात. आता प्रेम सागर यांचा मुलगा शिव सागर त्या फाऊंडेशनचं काम पाहणार आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने आज (रविवार) निधन झालं. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. मुंबईत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. प्रियाने ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. त्याचप्रमाणे ‘या सुखांनो या’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मराठी मालिकांमध्येही ती झळकली होती.
