रामायणात ‘लक्ष्मण’ साकारणाऱ्या सुनील यांचा दोनदा घटस्फोट, कुठे आहे दुसरी पत्नी?
रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुनील लहरी खऱ्या आयुष्यात मात्र एकटेच आहेत. त्यांनी दोनदा लग्न केलं असून त्यांचे दोन्ही लग्न अयशस्वी ठरले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा फोटो नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे.

रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका आजसुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत अरुण गोविल आणि सुनील लहरी यांनी राम-लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. या दोन्ही कलाकारांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आजही प्रेक्षक त्यांना राम आणि लक्ष्मणाच्या रुपातच पाहतात. पडद्यावर लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना फार कमीच माहीत असेल. त्यांनी खऱ्या आयुष्यात दोन वेळा लग्न केलं असून हे दोन्ही लग्न अपयशी ठरले. सुनील लहरी यांनी राधा सेन यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यांना घटस्फोट दिल्यानंतर सुनील यांनी भारती पाठक यांच्याशी लग्नगाठ बांधली.
भारती पाठक आणि सुनील लहरी यांना एक मुलगा असून त्याचं नाव क्रिश पाठक असं आहे. क्रिशसुद्धा वडिलांप्रमाणेच अभिनयक्षेत्रात काम करतो. सुनील यांचं हे दुसरं लग्नंही फार काळ टिकलं नाही. मुलगा क्रिश नऊ महिन्यांचा असतानाच त्यांनी घटस्फोट घेतला होता. आई भारती यांनीच त्याचं संगोपन केलं होतं. सुनील लहरी जरी सेलिब्रिटी असले तरी त्यांची दुसरी पत्नी भारती पाठक नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिल्या आहेत. त्यांचा चेहरा कधीच समोर आला नव्हता. परंतु आता बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्री सारा खानच्या एका पोस्टमध्ये त्यांचा फोटो पहायला मिळाला.
View this post on Instagram
भारती पाठक या सोशल मीडियावर सक्रिय असून इन्स्टाग्रामवर त्यांचे 933 फॉलोअर्स आहेत. त्या एअरहॉस्टेस म्हणून काम करायच्या. सुनील लहरी आणि भारती यांचा मुलगा क्रिशने नुकतंच लग्न केलंय. ‘बिदाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा खानशी त्याने लग्न केलंय. सारा हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री असून ती बिग बॉस या शोमध्येही झळकली होती. सारा आणि क्रिशचं आंतरधर्मीय लग्न असल्याने सोशल मीडियावर ही जोडी चर्चेत आली आहे. या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं असून येत्या डिसेंबर महिन्यात निकाह आणि हिंदू विवाहपद्धतीनुसार पुन्हा लग्न करणार आहेत. “आम्ही डिसेंबर महिन्यात हिंदू आणि मुस्लीम विवाहपद्धतीनुसार लग्न करणार आहोत. कारण या लग्नाच्या निमित्ताने दोन वेगळ्या संस्कृती एकत्र आल्या आहेत. माझी सासू नैनीतालची आहे, त्यामुळे त्याठिकाणी आमचं लग्न होईल”, असं साराने सांगितलं होतं.
