‘भल्लालदेव’ला प्रेम गवसलं, अभिनेता राणा दग्गुबाती रिलेशनशिपमध्ये, कोण आहे मिहिका?

राणा दग्गुबातीने सोशल मीडियावर प्रेयसी मिहिका बजाजसोबतचा फोटो शेअर करत "आणि तिने होकार दिला" असं कॅप्शन दिलं (Rana Daggubati to wed entrepreneur Miheeka Bajaj)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:51 AM, 13 May 2020
'भल्लालदेव'ला प्रेम गवसलं, अभिनेता राणा दग्गुबाती रिलेशनशिपमध्ये, कोण आहे मिहिका?

मुंबई : ‘बाहुबली’ चित्रपटातील ‘भल्लालदेव’च्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीला त्याचं प्रेम गवसलं आहे. सोशल मीडियावर प्रेयसीसोबतचा फोटो शेअर करत राणाने आपण रिलेशनशिपमध्ये अडकल्याची खुशखबर चाहत्यांना दिली. (Rana Daggubati to wed entrepreneur Miheeka Bajaj)

मनोरंजन विश्वात कलाकारांची नावं एकमेकांशी जोडली जाण्यात नाविन्य राहिलेलं नाही. राणाचं नावही अनेक सहअभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. मात्र अनेक अभिनेते किंवा अभिनेत्री आपल्या रिलेशनशिपवर मोकळेपणाने बोलणं टाळतात. त्यामुळे राणाच्या “खुलेआम इश्क का इजहार”ने चाहत्यांसह अनेक कलाकारदेखील अवाक झाले आहेत.

राणा दग्गुबातीने सोशल मीडियावर प्रेयसीसोबतचा फोटो काल संध्याकाळी शेअर केला. “आणि तिने होकार दिला” असं कॅप्शन राणाने फोटोला दिलं आहे. सोबतच हार्ट शेप इमोजीही टाकला आहे. लॉकडाऊननंतर दोघांच्या लग्नाची तारीख ठरवली जाणार आहे.

आता ही तरुणी नेमकी कोण, हा प्रश्न सर्वांच्याच मनात येत होता. राणाने केवळ मिहिका बजाज असा हॅशटॅग देत तिची तोंडओळख करुन दिली. मिहिका बजाज ही हैदराबादमध्ये ‘ड्यू ड्रॉप’ या डिझाईन स्टुडिओची मालकीण आहे.

35 वर्षांच्या राणा दग्गुबातीने हाऊसफुल्ल 4, दम मारो दम, बेबी अशा हिंदी चित्रपटातही काम केले आहे. मात्र मुख्यत्वे तेलुगु आणि तमिळ सिनेमात तो झळकला. त्याचे वडील दग्गुबाती सुरेश बाबू हे तेलुगु चित्रपट निर्माते आणि वितरक आहेत.

राणा सध्या विष्णू विशालसमवेत ‘काडन’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. कोरोनामुळे याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. त्याने ‘नंबर 1 यारी विथ राणा सीझन 3’ चॅट शोमधून टीव्हीवरही कमबॅक केले. (Rana Daggubati to wed entrepreneur Miheeka Bajaj)