VHT : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुढील सामना केव्हा? जाणून घ्या तारीख
Rohit Sharma and Virat Kohli Vht 2025-2026 : विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत या हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात शतक ठोकलं. आता दोन्ही खेळाडू पुन्हा केव्हा मैदानात उतरणार? जाणून घ्या.

बीसीसीआयच्या आदेशानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी अनेक वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कमबॅक केलं. रोहित आणि विराट या दोघांनी पहिल्या सामन्यात धमाका केला. रोहितने सिक्कीम विरुद्ध दीडशतकी खेळी केली. तर विराटने आंध्र प्रदेश विरुद्ध शतक झळकावलं. या दोघांचे सामने टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात न आल्याने चाहत्यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केला. मात्र स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी रोहितचे बॅटिंग आणि फिल्डिंग करतानाचे काही मिनिटांचे व्हीडिओ शेअर केले जे सोशल मीडियावर व्हायरल झाले.
रोहित आणि विराट या दोघांनी शतक करत आपल्या टीमला या स्पर्धेत विजयी सुरुवात करुन देण्यात प्रमुख भूमिका बजावली. तसेच रोहित आणि विराटमुळे संघातील युवा खेळाडूंना त्यांच्यासोबत खेळण्याची आणि ड्रेसिंग रुममध्ये एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना रोहित आणि विराट या दोघांच्या पुढील सामन्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. मुंबई आणि दिल्ली हे दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? हे जाणून घेऊयात.
रोहित विराटचा दुसरा सामना केव्हा?
या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामने हे शुक्रवारी 26 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहेत. मुंबई विरुद्ध उत्तराखंड आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला जयपूरमध्ये सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. रोहितच्या सामन्यासाठी चाहत्यांना प्रतिक्षा आहे.
विराटची दिल्ली गुजरात विरुद्ध भिडणार
तर दुसऱ्या बाजूला विराटची टीम दिल्ली स्पर्धेतील आपला दुसरा सामना हा गुजरात विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याचा थरार हा बंगळुरुत बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये रंगणार आहे. या सामन्यालाही सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. रोहित आणि विराट जानेवारी 2026 मध्ये मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळणार आहेत. त्यामुळे दोघांसाठी सरावाच्या हिशोबाने ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे.
रोहित-विराटचा तडाखा
दरम्यान रोहित आणि विराट या दोघांनी शतकासह या स्पर्धेत कमबॅक करत चाहत्यांची मनं जिंकली. रोहितने अवघ्या 94 बॉलमध्ये 155 रन्स केल्या. रोहितने या खेळीत 18 चौकार आणि 9 षटकार लगावले.
तर रनमशीन अर्थात विराट कोहली याने आंध्र प्रदेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. विराटने 101 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह एकूण 131 धावा केल्या. आता दोघे दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करतात? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.
