श्रीमंत कुटुंबाची मुलगी, पती होता सेलिब्रिटी कुक, तरी रानू मंडलच्या नशिबी गरिबी का? आता अशी अवस्था
रातोरात सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलेली रानू मंडल आता पुन्हा एकदा हलाखीचं जीवन जगतेय. ती ज्या घरात राहतेय, तिथे सर्वत्र कचरा पसरला आहे, तिच्याकडे जेवायला अन्न नाही, तिची मानसिक स्थितीही चांगली नाही.

या जगात अशी असंख्य लोकं आहेत, ज्यांनी कठोर परिश्रम करून गरिबीवर मात केली आणि चिकाटीने स्वत:चं नशीब घडवलं. त्याचवेळी असेही अनेक लोक आहेत, ज्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात भरपूर संपत्ती पाहिली, विलासी जीवन जगले, परंतु काही चुकीच्या निर्णयांमुळे त्यांना सर्वस्व गमवावं लागलं. रानू मंडलची कहाणीसुद्धा अशीच काहीशी आहे. 2019 मध्ये पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्टेशनवर रानू मंडल लता मंगेशकर यांचं ‘इक प्यार का नगमा है’ हे गाणं गाताना दिसली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि एका रात्रीत रानू मंडल इंटरनेट सेन्सेशन बनली. त्यानंतर तिला रिअॅलिटी शोजमध्ये आमंत्रित करण्यात आलं आणि तिथे गायक, संगीतकार हिमेश रेशमियाने त्याच्या एका चित्रपटात तिला दोन गाणी गाण्याची संधी दिली. सर्वकाही ठीक चाललं होतं. रानूला प्रसिद्धी आणि पैसा मिळत होता, पण अचानक सर्वकाही वाया गेलं. काही महिन्यांपूर्वी रानू मंडल पुन्हा अशा अवस्थेत आढळली, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिच्याकडे घालण्यासाठी कपडे नव्हते आणि खाण्यासाठी अन्न नव्हतं.
रानू मंडल पहिल्यापासूनच अशा अवस्थेत नव्हती. जरी तिचा जन्म गरिबीत झाला असला तरी ती एकेकाळी श्रीमंत होती. एका मुलाखतीत रानूने खुलासा केला होता की ती एका श्रीमंत कुटुंबातून आली आहे आणि प्रसिद्ध अभनेते फिरोज खान यांच्याशी तिचे संबंध होते. रानू जरी बंगालच्या रस्त्यांवर भीक मागताना दिसली असली तरी तिचा जन्म फूटपाथवर झाला नव्हता. 2019 मध्ये रानू मंडलने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, “मी फूटपाथवर जन्मले नव्हते. माझं कुटुंब श्रीमंत होतं. मी फक्त सहा महिन्यांची असताना मला आई-वडिलांपासून वेगळं करण्यात आलं. लग्नानंतर आम्ही पश्चिम बंगालहून मुंबईला आलो होतो.”
View this post on Instagram
रानू मंडलचं पूर्ण नाव रानू मारिया मंडल आहे. काही रिपोर्ट्समध्ये तिचं नाव रानू रे आणि रानू बॉबी असंही म्हटलं गेलंय. आईवडिलांपासून वेगळं झाल्यानंतर आजीने तिचं संगोपन केलं. वयात आल्यानंतर तिचं लग्न झालं आणि ती पतीसोबत मुंबईला आली. मुंबईत आल्यानंतर ती छोटीमोठी कामं करू लागली होती. मुंबईतील क्लबमध्ये ती गाणी गाऊ लागली होती. तर तिचा पती दिवंगत अभिनेते फिरोज खान यांच्याकडे कुक म्हणून काम करत होता. त्यावेळी त्यांचा मुलगा फरदीन खान कॉलेजमध्ये शिकत होता.
रानू मंडलचं दोन वेळा लग्न झालं होतं. पहिल्या पतीच्या निधनानंतर तिने दुसरं लग्न केलं, परंतु दुसऱ्या पतीनेही तिला सोडून दिलं होतं. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पतीच्या निधनानंतर रानू नैराश्यात गेली होती. अखेर मुलांना घेऊन ती पश्चिम बंगालला परत गेली. तिथल्या रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन ती चार पैसे कमावू लागली होती. अशातच मुलीनेही रानूची साथ दिली. दहा वर्षांपर्यंत मुलीने तिच्याशी कोणताही संपर्क साधला नाही.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू मंडलचं नशीब पुन्हा बदलू लागलं होतं. तिला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली, परंतु हेसुद्धा फार काळ टिकलं नाही. रानू आता पुन्हा पहिल्यासारखं गरीबीचं आयुष्य जगतेय. तिची मानसिक स्थितीसुद्धा ठीक नसल्याचं समजतंय.