गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चांमागे दडलीये इतकी मोठी प्लॅनिंग? वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहेत. सुनिताने विविध मुलाखतींमध्ये याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. परंतु घटस्फोटाच्या या चर्चांमागे काहीतरी दडल्याचा खुलासा एका वरिष्ठ लेखकाने केला आहे.

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सतत होत आहेत. 37 वर्षांच्या संसारानंतर ही जोडी विभक्त होणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. परंतु गणेशोत्सवादरम्यान एकत्र येत दोघांनी या चर्चा फेटाळल्या होत्या. तरीसुद्धा गोविंदाच्या पत्नीकडून विविध मुलाखतींमध्ये वारंवार अशा गोष्टी सांगितल्या जात आहेत किंवा अशी वक्तव्ये केली जात आहेत, ज्यावरून पती-पत्नीमधील मतभेत अधोरेखित होत आहेत. या दोघांच्या घटस्फोटाच्या आणि वैयक्तिक मतभेदांच्या चर्चा सतत का होत आहे, यामागचं कारण वरिष्ठ लेखक, पत्रकार आणि चित्रपट इतिहासकार हनिफ झवेरी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.
“गोविंदा त्याचा भाचा कृष्णा अभिषेकशी बोलत नाही. या वादाला बरीच वर्षे झाली. कौटुंबिक वादाबद्दल मीडियासमोर कृष्णा व्यक्त झाला. परंतु गोविंदा कधीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या बोलत नाही. आता त्याच्या पत्नीच्या माध्यमातून सर्व गोष्टी का बोलल्या जात आहेत? हे सर्व काय आहे”, असा सवाल झवेरी यांनी केला.
याविषयी ते पुढे म्हणाले, “त्यांच्या वैवाहिक आयुष्यात फूट पडल्याचं मला वाटत नाही. आतापर्यंत ते दोघं एकत्र चांगलं आयुष्य जगले आहेत. मुलांनाही चांगल्याप्रकारे मोठं केलं. सुनिताला हे सर्व बोलायची गरज नव्हती, असंही काही लोक म्हणतायत. मला असं वाटतं की, हे सर्व गोविंदाला पुन्हा चर्चेत किंवा प्रकाशझोतात आणण्यासाठी केलं जातंय. कारण गोविंदा बऱ्याच काळापासून लाइमलाइटपासून दूर होता. तो राजकारण आणि चित्रपटांमध्येही फारसा सक्रिय नाही. त्यामुळे हे सर्व मला मूर्खपणाचं वाटतं.”
गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचाही आरोप करण्यात आला होता. त्यावर हनिफ झवेरी यांनी सांगितलं, “आजवरच्या कारकिर्दीत गोविंदाचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. राणी मुखर्जी, करिश्मा कपूर.. अशी अनेक नावं आहेत. परंतु त्यात काही तथ्य नव्हतं. नीलम आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांचं एकमेकांशी नाव जोडलं गेलं होतं. त्यावेळी मासिक किंवा चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अशा चर्चा पसरवल्या जायच्या. आजसुद्धा असंच होतं. सुनिता तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. जर अफेअरच्या चर्चांमध्ये तथ्य असतं तर तेव्हाच सुनिताने पतीला सोडलं असतं. त्याचवेळी तिने मोठा हंगामा केला असता. त्यामुळे हे सर्व पब्लिसिटी स्टंट आहे, असं मला वाटतं.”
