Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’चं सर्वत्र कौतुक, पण रिचा चड्ढाने मांडलं वेगळंच मत; “धार्मिक कथा सेफ पण..”
Hanuman Ansh: हनुमान अंश’च्या अभूतपूर्व यशामुळे छोट्या बजेटच्या चित्रपटांकडे पुन्हा एकदा इंडस्ट्रीचं लक्ष वेधलं गेलं आहे. मात्र, रिचाच्या या वक्तव्यामुळे या यशाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन समोर आला आहे.

Hanuman Ansh: नीम करोली बाबा यांच्यावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या दोन कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 423 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे कमी बजेटच्या चित्रपटांसाठी ही कामगिरी मोठं उदाहरण मानली जात आहे. अनेक कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनीही या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. परंतु आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रिचा चड्ढा हिने मात्र या चित्रपटाबद्दल वेगळंच मत मांडलं आहे. या एका चित्रपटाच्या यशावरून 2026 हे वर्ष कंटेंटवर आधारित चित्रपटांचं वर्ष ठरवणं घाईचं ठरेल, असं ती स्पष्ट म्हणाली.
विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित ‘हनुमान अंश’ हा नीम करोली बाबांच्या जीवन आणि आध्यात्मिक प्रवासापासून प्रेरित चित्रपट आहे. सुरुवातीला या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई अवघी काही लाख रुपयांमध्ये होती. मर्यादित शोसह प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सुरुवातीची कामगिरी पाहता तो फारसा प्रभाव पाडणार नाही, असंच चित्र होतं. मात्र, हळूहळू प्रेक्षकांकडून झालेल्या ‘माऊथ पब्लिसिटी’मुळे चित्रपटाला वेग मिळाला. प्रदर्शनानंतरच्या दिवसांमध्ये कमाई वाढत गेली आणि अखेर ‘हनुमान अंश’ने 400 कोटींचा टप्पा पार केला.
काय म्हणाली रिचा चड्ढा?
‘हनुमान अंश’च्या यशामुळे 2026 मध्ये प्रेक्षक मोठ्या बजेटपेक्षा चांगल्या कंटेंटला पसंती देत आहेत का, असा प्रश्न ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रिचाला विचारण्यात आला. मात्र, तिने या मताशी पूर्णपणे सहमती दर्शवली नाही. केवळ एका चित्रपटाच्या यशावरून संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झाला आहे, असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, असं ती पुढे म्हणाली. इतकंच नव्हे तर, धार्मिक आणि पौराणिक विषयांना भारतात आधीपासूनच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे ‘हनुमान अंश’चं यश हे केवळ कंटेंटच्या विजयाचं उदाहरण म्हणून पाहण्याऐवजी त्याच्या धार्मिक आणि पौराणिक विषयाचाही विचार करायला हवा, असं मत तिने मांडलं. तिने हे देखील मान्य केलं की धार्मिक आणि पौराणिक कथा पाहणं सुरक्षित मानलं जातं आणि लोक त्या पाहतात. मात्र यामुळे काहीतरी सकारात्मक घडतंय असं म्हणणं खूप घाईचं ठरेलं.
भारतीय चित्रपटाला खऱ्या अर्थाने कंटेंट-ड्रिव्हन (कंटेंटच्या जोरावर यश मिळवणारा) बनवायचं असेल तर मजबूत कथा आणि उत्तम स्क्रिप्टवर भर देणं आवश्यक असल्याचं रिचाने सांगितलं. विशेषतः लेखकांना चांगला मोबदला आणि योग्य संधी मिळाल्या पाहिजेत, असंही ती म्हणाली. तिच्या मते, लेखकांच्या मेहनतीला योग्य आर्थिक पाठबळ मिळालं तर अधिक प्रभावी कथा तयार होऊ शकतात. अशा चांगल्या स्क्रिप्टवर आधारित चित्रपट सातत्याने यशस्वी झाले, तरच भारतीय सिनेमात कंटेंटला प्राधान्य देण्याचा मोठा बदल झाल्याचं म्हणता येईल.
