‘कांतारा’मधील चावुंडी देवीची नक्कल करणाऱ्या रणवीरवर भडकला ऋषभ शेट्टी; म्हणाला “मला खूप..”
अभिनेता रणवीर सिंहने 'इफ्फी'च्या मंचावर 'कांतारा: चाप्टर 1'मध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीची नक्कल केली होती. त्यावरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त झाला होता. आता ऋषभ शेट्टीने त्यावर मौन सोडलं आहे. रणवीरला सुनावत म्हणाला..

गोव्यात पार पडलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वसाच्या (इफ्फी) समारोप समारंभात अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने (HJS) रणवीरविरोधात तक्रार दाखल केली होती. ‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केल्याने रणवीरवर तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. याप्रकरणी विरोध तीव्र होताच त्याने जाहीर माफीसुद्धा मागितली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता ऋषभ शेट्टीने मौन सोडलं आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात त्याने याविषयी भाष्य केलं.
काय म्हणाला ऋषभ शेट्टी?
‘बिहाइंड वुड्स इन चेन्नई’ या कार्यक्रमात रणवीरचं नाव न घेता ऋषभ म्हणाला, “अशा पद्धतीचा चित्रपट बनवण्यात रिस्क असते. आपली संस्कृती आणि परंपरा ही लोकांना पॉप कल्चर वाटू नये. दिग्दर्शक म्हणून मी याबद्दल अनेकांशी बोललो होतो आणि त्यांच्या परवानगीनेच अत्यंत आदरपूर्वक ही भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा लोक स्टेजवर देवतेची नक्कल करतात, तेव्हा मला खूप अनकम्फर्टेबल वाटतं. दैवी तत्त्व हे अत्यंत संवेदनशील आणि पवित्र असतात. मी जिथे कुठे जातो, तिथे लोकांना विनंती करतो की त्याला स्टेजवर परफॉर्म करू नका किंवा त्याची नक्कल करू नका. या सगळ्याशी मी भावनिकदृष्ट्या जोडलेलो आहे.”
रणवीर सिंहने मागितली माफी
‘कांतारा या चित्रपटातील ऋषभच्या अभूतपूर्व परफॉर्मन्सला अधोरेखित करण्याचा माझा हेतू होता. ऋषभने तो ठराविक सीन ज्या जबरदस्त पद्धतीने सादर केला, त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे मला माहित आहे. त्यासाठी मी त्याचं खूप कौतुक करतो. आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि विश्वासाचं मी नेहमीच मनापासून आदर करतो. माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’, अशा शब्दांत रणवीरने दिलगिरी व्यक्त केली होती.
तुलू समुदायात चावुंडी देवीला खूप मानलं जातं. अशा देवीचं अपमानास्पद पद्धतीने चित्रण किंवा वर्णन करणं म्हणजे त्यांचा अनादर करण्यासारखंच आहे. अशा कृत्यामुळे जनतेत आक्रोश पसरू शकतो आणि शांती भंग होऊ शकते, असं हिंदू जनजागृती समितीने तक्रारीत म्हटलं होतं.
