रुबिना दिलैकच्या बहीण अन् वडिलांचा अपघात; नेमकं काय घडलं?
अभिनेत्री रुबिना दिलैकच्या बहिणीच्या गाडीचा अपघात झाला. याविषयी तिने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये माहिती दिली आहे. रुबिनाची बहीण ज्योतिका ही प्रसिद्ध युट्यूबर आहे. वडील आणि पतीसोबत ती शिमल्याला जात असताना हा अपघात झाला.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैकच्या बहिणीच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्योतिका दिलैक असं तिचं नाव असून ती एक युट्यूबर आहे. रुबिनाच्या बहिणीला बिग बॉस या शोमध्येही पाहिलं गेलं होतं. रुबिना बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली असताना तिची बहीण पाहुणी म्हणून तिथे पोहोचली होती. आता ज्योतिकाच्या तिच्या युट्यूबवरील व्लॉगद्वारेच अपघाताची माहिती दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ज्योतिका तिच्या वडील आणि पतीसोबत चंदीगडहून शिमल्याला जात होती. त्याचवेळी रस्त्यात त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीने मागून धडक दिली.
मागून दुसऱ्या गाडीने जोरदार धडक दिल्याने ज्योतिकाच्या गाडीचं खूप नुकसान झालं आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथे रस्त्याच्या दुरुस्तीचं काम चालू होतं. त्यामुळे बराच चिखलसुद्धा होता. सुदैवाने ज्योतिका आणि तिच्या गाडीत असलेल्या इतरांना कोणतीही दुखापत झाली नाही. गाडीमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचं समजतंय. रुबिनाची बहीण नुकतीच थायलँड ट्रिपला गेली होती. ती ट्रिपवरून घरी परतत होती. तर तिचे वडील चंदीगडमध्ये शेतीचं काम आवरून घरी जात होते. सर्वजण एकाच कारने प्रवास करत होते. ज्योतिकाने तिच्या युट्यूब चॅनेलवर या घटनेसंदर्भातील व्लॉग पोस्ट केला आहे. ज्योतिकाच्या युट्यूब चॅनलचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत. या चॅनलच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील सर्व अपडेट्स चाहत्यांना देत असते.
रुबिना दिलैकबद्दल बोलायचं झाल्यास, ती टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘छोटी बहू’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. यामध्ये तिने साकारलेली राधिकाची भूमिका घराघरात पोहोचली होती. त्यानंतर ती ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’, ‘जीनी और जुजू’ यांसारख्या मालिकांमध्येही झळखली. तिने ‘बिग बॉस’ आणि ‘लाफ्टर शेफ’ यांसारख्या शोजमध्येही भाग घेतला होता. आता ती लवकरच ‘पती पत्नी और पंगा’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती पती अभिनव शुक्लासोबत सहभागी होणार आहे.
