निळूभाऊंचा असा चित्रपट ज्याने थेट ‘बर्लिन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये स्थान मिळवलं, 50 वर्षांनी पुन्हा प्रदर्शित
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या 'सामना'ला आज 50 वर्षे पूर्ण झाली. निळू फुलेंच्या या चित्रपटाने थेट बर्लिन चित्रपट महोत्सवात धुरळा उडवून दिला होता. आज 50 वर्षांनी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला आहे.

दादा कोंडके जेव्हा त्यांच्या विनोदी चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीवर आपली खास ओळख निर्माण करत होते, तेव्हा बर्लिन चित्रपट महोत्सवातही एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने खळबळ उडवून दिली होती. जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. त्यानंतर देशात आणीबाणी लागू झाल्यामुळे चित्रपटांवर बंदी घालण्यात आली. नर्गिससारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या वकिलीमुळे हा चित्रपट ‘बर्लिन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पोहोचला होता आणि त्याचं तेवढं कौतुकही झालं होतं.
हा चित्रपट म्हणजे ‘सामना’. ‘सामना’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी, आज सोमवार 2 जून रोजी पुण्यात चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये काँग्रेस नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे देखील उपस्थित होते.
‘सामना’मध्ये या कलाकारांनी काम केले होते
सामना हा चित्रपट 10 जानेवारी 1975 रोजी प्रभात टॉकीज, पुणे येथे प्रदर्शित झाला होता. तर हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या सेंट्रल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रामदास फुटाने यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. चित्रपटाची कथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली होती आणि दिग्दर्शक जब्बार पटेल होते. निळू फुले, हिंदुराव धोंडे पाटील यांसारखे दिग्गज अभिनेते तर डॉ.श्रीराम लागू गांधीवादी भूमिकेत दिसले. स्मिता पाटील, मोहन आगाशे, विलास रक्ते इत्यादी कलाकारही या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग होते.
आणीबाणीमुळे बंदी घालण्यात आली
ज्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच वर्षी इंदिरा गांधींच्या सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती. त्यानंतर चित्रपटांच्या प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली. ‘सामना’वरही याचा परिणाम झाला, पण त्यावर बंदी घालण्यामागे आणखी एक कारण होते. या चित्रपटाद्वारे सरकारविरोधी विचारांना प्रोत्साहन दिले जात आहे असे सरकारचे मत होतं.
- Nilu Phule
‘बर्लिन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये चित्रपटामुळे खळबळ उडाली
25 जून 1975 रोजी भारतात आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्याच्या एक दिवस आधी रामदास फुटाणे, निळू फुले आणि श्रीराम लागू बर्लिनला पोहोचले होते. पण या महोत्सवात चित्रपट पाठवण्याचा पुढाकार नर्गिस दत्त यांनी घेतला. नर्गिसने दिल्लीत ‘सामना’चा एक खास शो आयोजित केला होता आणि तो बर्लिन चित्रपट महोत्सवात पाठवण्याची मागणी केली होती. त्याला मान्यता मिळाली. चित्रपटातील कलाकारांची निवड झाल्यानंतर, नर्गिस देखील पती सुनील दत्तसह बर्लिनला पोहोचल्या होत्या. हा चित्रपट तिथल्या 25 व्या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आल्यानं चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती.
पुनर्प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा चित्रपटाला भरपूर पसंती
आणीबाणीपूर्वी ‘सामना’ प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्याच दिवशी तो प्रेक्षकांवर फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर 1977 मध्ये तो पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. यावेळी मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. बर्लिन चित्रपट महोत्सवात प्रवेश आणि आणीबाणीच्या बंदीमुळे या चित्रपटाने आधीच बातम्यांमध्ये स्थान मिळवले होते आणि त्याच्या पुनर्प्रदर्शनानंतर चित्रपटाला भरभरून प्रेक्षकांची पसंती मिळाला.
