रिलेशनशिपबद्दल समजताच वडिलांनी पाईपने काळंनिळं होईपर्यंत मारलं; मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत अंजीची भूमिका साकारलेली अभिनेत्री कोमल कुंभार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. प्रेमसंबंधाबद्दल घरी समजताच मला पाईपने मारलं, असा धक्कादायक खुलासा तिने केला.

अभिनेत्री कोमल कुंभारने ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत भूमिका साकारून घराघरात लोकप्रियता मिळवली. नुकतंच तिने गोकुळ दशवंतशी लग्न केलं. या दोघांच्या नात्याला कुटुंबीयांची संमती नव्हती. त्यामुळे कोमल आणि गोकुळचं लग्न चांगलंच चर्चेत होतं. कोमलच्या कुटुंबीयांनी तिच्या या नात्याला विरोध केला होता. कुटुंबीयांचा विरोध पत्करत ती करिअरसाठी मुंबईला आली आणि इथे आपली वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोमल तिच्या संघर्षाविषयी आणि खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
या मुलाखतीत कोमल म्हणाली, “मी मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं आणि त्यात माझी निवडसुद्धा झाली होती. पण मला माझे घरचे सोडायला तयार नव्हते. अखेर मामाला घरी बोलावून त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हाही मी मुंबईत येऊन काम करण्यावर ठाम होते. तेव्हा माझ्या आईला माझं कुणाशी प्रेमसंबंध आहे का, असा संशय आला. तिने मला स्पष्टच विचारलं होतं. तेव्हा मी तिला होकारार्थी उत्तर दिलं होतं. खरंतर मला तेव्हा ती गोष्ट घरी सांगायची नव्हती. पण प्रेमात किती ताकद असते, हे मला त्यादिवशी समजलं होतं. मला गोकुळसोबत मुंबईला जायचं आहे, असं मी म्हटल्यावर घरात शांतता पसरली. माझ्या मामाने ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगितली. तेव्हा मला पाईपने मारण्यात आलं होतं. त्यांना मला समजावण्याचा, माझं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते.”
View this post on Instagram
“त्यावेळी तिच्या अंगावर पाईपच्या माराचे वळ उठले होते. तशाच अवस्थेत तिने मालिकेच्या प्रोमोचं शूटिंग पूर्ण केलं होतं”, असं गोकुळने सांगितलं. याविषयी कोमल पुढे म्हणाली, “वडिलांनी नंतर मला समजावण्याचा प्रयत्न केला की असं करू नकोस. पण मी ऐकलं नाही. अखेर दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांनी मला सांगितलं, तू जा.” कोमल आणि गोकुळने 25 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न केलं. कोमलने ‘अबोली’ या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत ती अंजीच्या भूमिकेत होती.
