“आम्हाला आर्थिक समस्याच नव्हती..”; सैफवर हल्ला करणाऱ्या चोराच्या वडिलांचा गौप्यस्फोट
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी गौप्यस्फोट केला आहे. आम्हाला कोणतीच आर्थिक समस्या नव्हती, असं त्यांनी म्हटलंय. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने सैफवरील हल्ल्याच्या 38 तासांनंतर घरी वडिलांना फोन केला होता.

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीत नवनवीन माहिती समोर येत आहे. सैफवर त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरात चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने 38 तासांनी त्याच्या वडिलांना फोन केला होता. बांगलादेशातील झलोकाठी इथल्या घरी त्याने वडिलांना फोन केल्याचं चौकशीत समोर आलंय. वडिलांच्या बँक खात्यात दहा हजार टका (बांगलादेशी रुपये) ट्रान्सफर केल्याची माहिती त्याने फोनद्वारे दिली. त्याचसोबत पुढच्या काही दिवसांसाठी त्याच्याकडे तीन हजार रुपये शिल्लक असल्याचं त्याने वडिलांना सांगितलं होतं. सैफवरील हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर आरोपीच्या वडिलांनी त्यांच्या मुलाबाबतचं वृत्त टीव्ही आणि सोशल मीडियावर पाहिलं होतं.
आरोपीचे वडील बांगलादेशमध्ये एका जूट कंपनीत क्लर्क म्हणून काम करतात. त्यांचं नाव रुहुल अमीन फकीर असं आहे. मुलाविषयी बोलताना ते म्हणाले, “हे प्रकरण पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. आम्हाला कोणतीही आर्थिक समस्या नाही आणि आमचा मुलगा असा गुन्हा करेल अशी कल्पनाही आम्ही कधी केली नव्हती.”
सैफ आणि करीनाला मुंबई पोलिसांची सुरक्षा
सैफ अली खानवर चोरट्याने चाकू हल्ला केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सैफ आणि त्याची पत्नी करिना या दोघांनाही मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. याशिवाय सैफ राहत असलेल्या इमारतीची खासगी सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीने सैफवर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या चाकूचे दोन तुकडे पोलिसांनी जप्त केले असून तिसऱ्या तुकड्याचा सध्या शोध सुरू आहे. त्यासाठी वांद्रे तलाव परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली. हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सैफ आणि करीना यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी एक पोलीस शिपाई तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेऊन त्यांना सुरक्षा पुरवण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय हल्ल्यानंतर सैफच्या इमारतीतील खासगी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. इमारतीत अद्ययावत सुरक्षा प्रणाली बसवण्यात आली असून सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहेत.




पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी शहजाद म्हणाला, “मी सैफ अली खानचं घर ओळखत नाही. सदगुरू शरण इमारतीत प्रवेश करताना मी इतर काही घरांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व घरं बंद होती. पण जेव्हा मी सैफच्या घराजवळ पोहोचलो, तेव्हा त्याच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता. म्हणून मी आत शिरण्यात यशस्वी ठरलो.” सैफवरील हल्ल्याचं प्रकरण मीडियासमोर आल्यानंतर आरोपीला समजलं की तो ज्या घरात गेला होता, ते अभिनेता सैफ अली खानचं घर होतं.