
Saif Ali Khan Attacker Arrested : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अलियान उर्फ विजय दास असे या आरोपीचे नाव आहे. विजय दास याला ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक केलेला आरोपीच्या नावांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातून मध्यरात्री ३ च्या सुमारास ही अटक करण्यात आली आहे. आरोपी विजय दासला ठाण्याच्या लेबर कॅम्पजवळील जंगलातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तब्बल २०० जण असलेल्या पोलिसांच्या पथकाने सापळा रचत मुख्य आरोपीला अटक केली आहे. यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने एक-दोन नव्हे तर चार नावे सांगितली आहेत.
पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर मध्यरात्री त्याला चेंबूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या टीमकडून आरोपीची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान त्याने त्याची विविध नावे सांगितली. पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या चौकशीत त्याने बिजॉय दास असे म्हटले. यानंतर त्याने विजय दास असे सांगितले. यानंतर त्याने मोहम्मद इलियास आणि बीजे असे स्वत:चे नाव असल्याचे उघड केले. आरोपीकडून वारंवार नाव बदलले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याचे खरं नाव काय याचा शोध सुरु होता.
अखेर आता पोलिसांनी केलेल्या तपासानंतर त्याचे खरे नाव समोर आले आहे. अभिनेता सैफ अली खानवर यांच्या घरी जबरी चोरी आणि हल्ल्याची जी घटना झाली, त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आहे. त्याचे वय ३० वर्ष असे आहे. हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न होत आहे. तो मूळचा बांग्लादेशच्या झलोकोठी जिल्ह्यातील राजाबरीया थाना नॉलसिटी या गावातील येथील रहिवासी असल्याची माहिती डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिली.