Saiyaara : बॉक्स ऑफिसवर तुफान; ‘सैयारा’ चा अर्थ तरी काय? तुम्हाला माहिती आहे का?
What is Saiyaara Meaning : 'सैयारा' व्हायरसने बॉक्स ऑफिसवर तुफान आणलं आहे. तर काही तरुणी थिएटरमध्ये बेशुद्ध होत असल्याचे प्रकार पण वाढले आहेत. हा एक नवीनच ट्रेंड सध्या अनेक सिनेमागृहातून समोर आला आहे.

‘सैयारा’ व्हायरसने सिनेमागृह तुडुंब भरली आहेत. काही ठिकाणी थिएटर्स प्रेक्षकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. त्यातच बेशुद्ध होण्याचा एक नवीन ट्रेंड पण अनेक सिनेमागृहातून पुढे आला आहे. हे सर्व प्रकार या सिनेमाभोवती वलय तयार करायला आणि प्रेक्षकांची गर्दी खेचायला यशस्वी ठरली आहेत. पण सैयारा या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? अनेकांनी त्यासाठी गुगल केलंय. पण ज्याने शायरीच्या प्रांतात मुशाफिरी केली आहे, त्याला या शब्दाची मिठास, खटास सांगणे न लागे.
सैयारा अरबी शब्द, त्याचा अर्थ काय?
तर सैयारा हा अरबी शब्द आहे. पण तो भारतीय शेरो-शायरीत सहजरित्या वापरला जातो. शायरीच्या अनेक शेरांमध्ये या रोचक शब्दाने रंगत भरली आहे. मुळ अरबी भाषेत सैयारा याचा अर्थ आकाशातील तारा अथवा आकाशातील चमकणारी वस्तू असा होतो. पण शायरीत हा शब्द येताच त्याला नवीन स्वरूप मिळते. त्याचा अर्थ बदलतो.
सैयाराच्या विविध अर्थछटा आहेत. शायर त्याच्या भावना वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याचा मोठ्या खुबीने वापर करतो. गाण्यातील हरकतीने जसे कान आणि मन तृप्त होते. तशीच शब्दांची ही हरकत कलिजाला दैवी, रूहानी सुकून देऊन जाते. मनात उरतो तो केवळ तृप्तीचा भाव. सैयारा असाच हरफन मौला होतो. तो सदूर असा आवडता माणूस होतो. आकाशातील चमकता तारा होतो. जो आवडतो पण त्याला स्पर्श करू शकत नाही असा जीवचा प्रीतम होतो. अर्थछटांच्या या वेडात फक्त तुम्हाला नहाता आले पाहिजे.
एक था टायगर या चित्रपटातील एका गाण्याच्या ओळीत त्याची वेगळी अर्थछटा समोर येते.
आसमां तेरा मेरा हुआ, ख़्वाब की तरह धुंआ धुंआ
आसमां तेरा मेरा हुआ, सांस की तरह रुआं रुआं
जाए जहां तू जाए पाये मुझे ही पाये
साये ये मेरे हैं तुझ में समाए
सैयारा मैं सैयारा
सितारों के जहां में मिलेंगे अब यारा
तर या सैयाराचा अर्थ मुक्त आत्मा असा होतो. तो कुणाच्याच ताब्यात राहत नाही. उलट तो सर्वव्यापी झाला आहे. तो सर्वदूर आहे. त्यानेच ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. काय सुंदर कल्पना आहे नाही का?
सैयारा -मुक्तीचे प्रतिक
सैयारा हा शायरांचा जणू लाडका शब्दच आहे. शायरांचे शब्द जसे मुक्त पणे उधळले जातात. त्यांना स्वातंत्र्याचा हव्यास असतो. या शब्दांना मुक्तीची तहान असते. त्यामुळेच अनेक शेरांमधून, शायरीतून सैयारा हा शब्द येतो. अल्लामा इकबाल यांचा एक प्रसिद्ध शेर आहे. ‘पीर-ए-गर्दूं ने कहा सुन के कहीं है कोई, बोले सय्यारे सर-ए-अर्श-ए-बरीं है कोई।’ याचा अर्थ असा आहे की, एक महान, रहस्यमय शक्ती आहे, जी ब्रह्मांडापेक्षा पण मोठी आहे. येथे सय्यारे या शब्दाचा अर्थ तारा, ग्रह असा आहे. सैय्यार हा मुक्तीचा प्रतिक आहे. तर काही ठिकाणी तो इश्क, प्रेमाचे प्रतिरूप आहे.
