बीफ खाण्याबद्दल सलीम खान यांचा मोठा खुलासा; म्हणाले “आमच्या घरात..”
सलमान खानचे वडील सलीम खान हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या कुटुंबाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. खान कुटुंबात गणेश चतुर्थी साजरी करण्याची परंपरा कधीपासून आहे, याविषयीही त्यांनी सांगितलं आहे.

दिवाळी, गणेश चतुर्थी असो किंवा ईद.. अभिनेता सलमान खानचे कुटुंबीय सर्व सण एकत्र साजरे करतात. सलमानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान हे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आंतरधर्मीय लग्न, घरातील गणेशोत्सव आणि धर्माप्रती आपले विचार यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. शांतीपूर्ण वातावरणात ते कसे लहानाचे मोठे झाले, कुटुंबाला कसं सांभाळलं आणि आपल्या परंपरेचा कसा सन्मान केला, मुलांना कशा पद्धतीने वाढवलं, याविषयी त्यांनी सांगितलं. दरवर्षी खान कुटुंबीयांकडून गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्याची परंपरा वडिलांनी सुरू केल्याचं सलीम खान यांनी सांगितलं.
‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत सलीम म्हणाले, “आम्ही इंदूरमध्ये राहत असताना माझे वडील डीएसपी होते. आमच्या घरात भाड्याने राहणाऱ्या हिंदूंसोबत ते मिळून-मिसळून राहायचे. धर्माच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करता ते एकत्र राहायचे, खायचे-प्यायचे आणि आनंद पसरवायचे. सलमाशी (सुशीला चरक) लग्न करण्याबद्दल माझ्या कुटुंबात कोणालाच आक्षेप नव्हता. माझे सासरे डेंटिस्ट होते. त्यांनी केवळ धर्मामुळे आमच्या लग्नाला आक्षेप घेतला होता. परंतु आमचं मजबूत नातं समजून घेतल्यानंतर त्यांनीही नातं स्वीकारलं होतं. आमच्या लग्नाला 60 वर्षे झाली आहेत, परंतु आजवर धर्म कधीच आमच्या नात्यात मध्ये आला नाही.”
View this post on Instagram
सलीम यांनी असंही सांगितलं की त्यांच्या मुस्लीम नातेवाईकांनाही त्यांच्या कोणत्याच निर्णयावर आक्षेप नव्हता. कारण सलीम इतरांपेक्षा वेगळे आहेत, हे त्यांना माहीत होतं. इतर लोकांप्रमाणेच ते कधी-कधी मद्यपान करायचे आणि त्यांच्या घरात कधीच बीफ खाल्लं जात नव्हतं. ते म्हणाले की, धर्माच्या शिकवणी गाईच्या पावित्र्यावर भर देतात आणि इस्लाम नेहमीच इतर धर्मांच्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतो.
“मी पवित्र कुराण इंग्रजीमध्ये वाचलंय आणि त्यातील संदेश मानवतेवर भर देणारे आहेत. मी 2013 मध्ये ‘महाभारत’ या मालिकेचा सल्लागार म्हणूनही काम केलं होतं. मला महाकाव्यांबद्दल बरंच माहिती आहे. मनोज कुमार यांच्या सुचनेनुसार, मी कोणतंही शुल्क न आकारता निर्मितीसाठीही मार्गदर्शन केलं होतं. मालिकेत काय दाखवायचं हे ठरवण्यास मी मदत केली होती”, असाही खुलासा सलीम खान यांनी केला.
