“सलमान भाईला मी सोडून दुसरं कोणीच..”; बॉडीगार्ड शेराचं वक्तव्य चर्चेत

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. गेल्या 29 वर्षांपासून तो सलमानसोबत काम करतोय. नुकतंच त्याने रेंज रोव्हर ही अत्यंत महागातली गाडी खरेदी केली. एका मुलाखतीत त्याने सलमानसोबत काम करण्याविषयी प्रतिक्रिया दिली.

सलमान भाईला मी सोडून दुसरं कोणीच..; बॉडीगार्ड शेराचं वक्तव्य चर्चेत
Salman Khan and his bodygaurd Shera
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 05, 2024 | 12:21 PM

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. गेल्या 29 वर्षांपासून तो सलमानसाठी काम करतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेराने सलमानसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. सलमानच्या बॉडीगार्डसाठी सोहैल खानने माझी शिफारस केली होती, असाही खुलासा त्याने केला. त्याचप्रमाणे शेराने हा विश्वासही व्यक्त केला की, सलमानसोबत इतकी वर्षे काम केल्यानंतर त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कोणीच ‘भाईजान’ला सांभाळू शकत नाही. ‘झूम’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेरा म्हणाला, “मी सलमान भाईसोबत गेल्या 29 वर्षांपासून काम करतोय. इतर अनेक बॉडीगार्ड हे सतत कलाकाराला बदलत असतात. पण सलमान भाईसोबत मी इतक्या वर्षांपासून टिकून आहे. मला नाही वाटत की मला सोडून दुसरा कोणी भाईला सांभाळू शकेल.”

सलमानसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना शेरा पुढे म्हणाला, “मी एका शोदरम्यान सोहैल खानच्या माध्यमातून सलमान भाईला भेटलो होतो. स्टेज शोदरम्यान काही समस्या निर्माण झाल्याने सलमानसोबत सुरक्षारक्षक असावा अशी सोहैलची इच्छा होती. त्यावेळी मी पगडी बांधायचो. जेव्हा सोहैल भाईने मला पाहिलं, तेव्हा तो म्हणाला, तू सलमान भाईसोबत काम का करत नाहीस? मी लगेच होकार दिला. सुरुवातील मी फक्त शोदरम्यान सलमानसोबत असायचो. मी सतत त्याच्या सुरक्षेसाठी नसायचो. हळूहळू भाईसोबत माझी चांगली मैत्री झाली आणि ती आजपर्यंत टिकून राहिली आहे. आमचं नातं खूप स्ट्राँग आहे. मी सरदार आहे आणि तो पठाण आहे. त्यामुळे ही जोडीच बेस्ट आहे असं मला वाटतं. मी भाईला सांगितलंय की जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी तुझी सेवा करेन.”

काही दिवसांपूर्वीच शेरा सोशल मीडियावर त्याच्या रेंज रोव्हर या आलिशान गाडीमुळे चर्चेत आला होता. शेराने नुकतीच 1.4 कोटी रुपयांची रेंज रोव्हर विकत घेतली आहे. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शेराचं मूळ नाव गुरमीत सिंह असून मुंबईतल्या अंधेरी इथल्या शीख कुटुंबात त्याचा जन्म झाला. बॉलिवूड आणि सलमानच्या आयुष्यात येण्यापूर्वी शेराला बॉडीबिल्डिंगची खूप क्रेझ होती. त्याने बॉडीबिल्डिंगच्या काही स्पर्धासुद्धा जिंकल्या आहेत.