“एखाद्याला तुम्ही एकदा, दोनदा माफ करू शकता, पण..”; पुतण्याच्या पॉडकास्टमध्ये सलमानचं मोठं वक्तव्य
अभिनेता सलमान खानची एक पॉडकास्ट मुलाखत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुतण्या अरहान खानला त्याने ही मुलाखत दिली असून त्यात तो विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाला आहे. या पॉडकास्ट मुलाखतीचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

अभिनेता सलमान खान लवकरच त्याचा पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावणार आहे. या नव्या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 2024 मध्ये अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहानने पॉडकास्ट सुरू केला होता. त्याच्या मित्रांसोबत मिळून त्याने या पॉडकास्टची सुरुवात केली होती आणि त्यात तो विविध सेलिब्रिटींच्या मुलाखतीत घेत होता. मात्र काही एपिसोड्सनंतर अरहानच्या या पॉडकास्टने विश्रांती घेतली होती. आता अरहानने त्याच्या युट्यूब चॅनलवर सर्वांत मोठ्या मुलाखतीचा टीझर पोस्ट केला आहे. काका सलमान खानची मुलाखत तो घेणार असून या मुलाखतीत अनेक खुलासे होणार आहेत.
या टीझरमध्ये सलमानच्या काही जुन्या मुलाखती आणि कुटुंबीयांसोबत घालवलेला वेळ या दोघांची झलक पहायला मिळते. एका जुन्या मुलाखतीत सलमानला म्हटलं जातं, “तू स्क्रीनवर जे करतोस, तो प्रत्येकाचा बिझनेस आहे.” त्यावर होकारार्थी मान हलवत सलमान म्हणतो, “खरंय. यालाच इमेज (प्रतिमा) असं म्हणतात. सर्वसामान्य भाषेत बोलायचं झाल्यास तुम्ही इमेज विकत आहात. मी तुमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती आहे.” या क्लिपनंतर टीझरमध्ये सलमानची आताची मुलाखत दिसते, ज्यामध्ये तो पुतण्या अरहानसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर गप्पा मारताना दिसतो.




View this post on Instagram
सलमान अरहानला सांगतो, “तुझ्या मित्रमैत्रिणींसाठी आणि कुटुंबीयांसाठी नेहमीच तुला उभं राहावं लागेल. हे प्रयत्न तुला सातत्याने घ्यावे लागतील. जर मी तुला सल्ला दिला, जो मी स्वत:ला देत असतो, मी स्वत:शी ज्या पद्धतीने बोलतो.. तर तू माझा तिरस्कार करशील. कारण मी स्वत:शी खूप कठोरपणे बोलतो.” या टीझरमध्ये सलमान माफीबद्दलही मोकळेपणे बोलताना दिसतो.
“एखाद्या व्यक्तीला तुम्ही एकदा, दोनदा किंवा तिनदा माफ करू शकतो.. चलो खल्लास”, असं सलमान अरहानला म्हणतो. यानंतर तो त्याला महत्त्वाचा सल्लादेखील देतो. “जेव्हा तुमचं शरीर नाही म्हणतं, तेव्हा तुमच्या मनाने हो म्हटलं पाहिजे. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही नाही म्हणतात, तेव्हा तुम्ही स्वत:लाच म्हटलं पाहिजे की, चला फक्त एक शेवटचा राऊंड”, असं तो पुतण्याला सांगतो.
सलमान लवकरच ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.