काही काम नाही म्हणून वायफळ बडबड..; ‘दबंग’च्या दिग्दर्शकाला सलमान खानने सुनावलं
'दबंग' या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने काही मुलाखतींमध्ये अभिनेता सलमान खान आणि त्याच्या भावंडांवर गंभीर आरोप केले होते. सलमान गुंड असल्याचं त्याने म्हटलं होतं. यावरून आता सलमानने त्याचं नाव न घेता सुनावलं आहे.

‘बिग बॉस 19’च्या ‘वीकेंड का वार’चा एपिसोड नेहमीच धमाकेदार असतो. कारण या एपिसोडमध्ये अभिनेता सलमान खान सर्वांची शाळा घेत असतो. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसोबत मजा-मस्ती करण्यासोबतच त्यांच्या चुकांवरून तो त्यांना सुनावतोही. म्हणूनच हा एपिसोड प्रेक्षकांना फार आवडतो. नुकत्याच पार पडलेल्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने तान्या मित्तलचा वाढदिवस साजरा केला. या एपिसोडमध्ये त्याने नाव न घेता ‘दबंग’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपवरही निशाणा साधला. अभिनवने गेल्या काही दिवसांत दिलेल्या मुलाखतींमध्ये सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. सलमानला ‘गुंडा’ म्हणत त्याच्यावर टीका केली होती. इतकंच नव्हे तर सलमानने माझं करिअर उद्ध्वस्त केलंय, असा आरोप अभिनवने केला होता. या सर्व आरोपांवर आणि टीकांवर आता सलमानने उत्तर दिलं आहे.
27 सप्टेंबर रोजी ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये तान्या मित्तलचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमानने जेव्हा तान्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तेव्हा तिने सलमानकडे एक इच्छा व्यक्त केली. सलमानने माझ्या कुटुंबासारखं बनावं, जेणेकरून मला इथे सुरक्षित वाटेल, असं ती म्हणाली. त्यावर सलमान बिग बॉसच्या घरातील सदस्यांशी बोलताना म्हणाला, “जे लोक माझ्याशी जोडले गेले आहेत किंवा याआधी जोडले गेले होते, ते सर्वजण आजकाल अडचणीत आहेत. बसल्या बसल्या लोक काहीही बडबड करत आहेत. हीच लोकं एकेकाळी माझं कौतुक करायचे. आता ते मला अजिबात पसंत करत नाहीत. आजकाल लोक पॉडकास्टमध्ये येऊन काहीही बडबडक करतात. कारण त्यांच्याकडे कोणतं काम नाही. माझी त्या सर्वांना विनंती आहे की, कृपया एखादं काम करा.”
सलमानने अभिनव कश्यपचं थेट नाव घेतलं नाही, परंतु त्याने हा इशारा अभिनववरच साधल्याचं नेटकरी म्हणत आहेत. यानंतर सलमानने बिग बॉसच्या घरातील सदस्यांनाही सल्ला दिला की, आयुष्यात काहीही घडलं तरी तुम्ही नेहमी तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनव कश्यपने असाही दावा केला होता की ‘तेरे नाम’ या चित्रपटातून भाऊ अनुराग कश्यपला सलमाननेच काढून टाकलं होतं. जेव्हा सलमानने अनुरागचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘निशानची’ला पाठिंबा दिला, तेव्हा हासुद्धा एक ढोंग असल्याचं त्याने म्हटलं होतं.
