लोकांचे करिअर बुडवले, तो गुंड…; आरोपांवर सलमानने सोडलं मौन, स्पष्ट म्हणाला..
'दबंग' चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खानवर इतरांचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. त्यावर आता सलमानने बिग बॉसच्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. सलमान काय म्हणाला, ते वाचा..

‘दबंग’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप आणि सलमान खान यांच्यातील वाद जगजाहीर आहे. या चित्रपटाच्या 15 वर्षांनंतर आता दिलेल्या एका मुलाखतीत अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांचे करिअर त्यांनी बुडवल्याचा आरोप अभिनवने केला आहे. या आरोपांवर आता खुद्द सलमानने प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिग बॉस 19’च्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये तो यावरून व्यक्त झाला. अभिनेत्री शहनाज गिल नुकतीच बिग बॉसच्या मंचावर आली होती. “सर, तुम्ही कित्येकांचं करिअर बनवलंत”, अशा शब्दांत ती सलमानचं कौतुक करते. त्यावर बोलताना सलमान अभिनवच्या आरोपांना प्रत्युत्तर देतो.
सलमान म्हणतो, “मी कुठे कोणाचे करिअर बनवले? करिअर बनवणारा तर वर (देव) आहे. मी अनेकांचं करिअर बुडवलं, असं लांछन मला लावलं गेलंय. खासकरून बुडवणारे तर माझ्या हातातच नाहीत. परंतु आजकाल सर्वकाही चालतं ना, की करिअर खाऊन जाईल. कोणाचं करिअर खाल्लं मी? जर खायचंच असेल तर मी माझं स्वत:चंच करिअर खाऊन टाकेन. कधी कधी आत्मसंतुष्ट होतो आणि मग सोडून देतो. पुन्हा मी माझ्या मुठ्ठीत आणण्याचा प्रयत्न करतो.”
सलमानने आजवर कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, झरीन खान, डेसी शाह, पुलकित सम्राट, आयुष शर्मा, स्नेहा उल्लाल यांसारख्या कलाकारांना इंडस्ट्रीत आणलं. याआधी 2000 मध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय आणि सलमान यांच्यात झालेला वाद सर्वांनाच माहीत आहे. सलमानमुळे विवेकचं करिअर उद्ध्वस्त झालं, असं म्हटलं गेलं. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातून भाऊ आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपला बाजूला काढल्याचाही खुलासा अभिनवने या मुलाखतीत केला.
“सलमान हा बॉलिवूडमधील स्टार सिस्टिमचा बाप आहे. तो एका अशा कुटुंबातून येतो, जे गेल्या 50 वर्षांपासून या फिल्म इंडस्ट्रीत आहेत. हे सर्व सूड घेणारी लोकं आहेत. ते संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण मिळवतात. जर तुम्ही त्यांच्याशी सहमत नसाल, तर ते तुमच्या मागे हात धुवून लागतात. त्याला अभिनयात अजिबात रस नाही. काम करून तो लोकांवर उपकार करतोय. सेलिब्रिटीच्या पॉवरमध्ये त्याला अधिक रस आहे, पण अभिनयात नाही. तो गुंड आहे”, अशी टीका अभिनवने केली.
