मिका सिंगप्रमाणे सलमानवरही बंदी घालू, सिने असोसिएशनचा इशारा

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्नात परफॉर्म केल्यामुळे बॉलिवूड गायक मिका सिंगवर बंदी घालण्यात आली आहे. सलमान खानने त्याच्यासोबत काम केलं, तर त्याच्यावरही बंदी घालण्याचा इशारा 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी'ने (FWICE) ने दिला आहे

मिका सिंगप्रमाणे सलमानवरही बंदी घालू, सिने असोसिएशनचा इशारा

मुंबई : पाकिस्तानातील कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल गायक मिका सिंगवर (Mika Singh) ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी’ने (FWICE) बंदी घातली होती. आता बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) मिकासोबत काम करण्याच्या तयारीत असल्यामुळे असोसिएशनने त्याच्यावरही बंदीचा इशारा दिला आहे.

मिका सिंगसोबत काम करणारे सिनेसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांवरही बंदी घालण्यात येईल, असं पत्रक फेडरेशनने काढलं होतं. त्याचवेळी सलमान मिका सिंगसोबत अमेरिकेत शो करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सलमान खानवरही बंदी घातली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सलमान खानने ऑगस्ट महिनाअखेरीस अमेरिकेतील सहा शहरांमध्ये एका कॉन्सर्टचं आयोजन केलं आहे. यावेळी सलमानच्या चित्रपटांतील गाण्यांचं सादरीकरण मिका 28 ऑगस्टला ह्यूस्टनमध्ये करणार आहे.

भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात 8 ऑगस्ट रोजी मिकाने गाणी सादर केली होती. त्यामुळे मिकावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती.

मिकावर सिने इंडस्ट्रीतील सर्वात मोठी संस्था ‘एफडब्लूआयसीई’ने थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मिकाने माफी मागण्याची तयारी दाखवली मात्र ती फेडरेशनने मान्य केली नाही. सिनेसृष्टीशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने मिकासोबत काम केलं तर त्या व्यक्तीवरही बंदी घालण्यात येईल, अशी नोटीस फेडरेशनने बजावली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *