संचिता आणि सुशांत सिंहच्या मृत्यूमध्ये ’14 जून’चं कनेक्शन… भावाचा मोठा दावा काय? प्रकरणात ट्विस्ट?
अभिनेत्री संचिता उगलेच्या 14 जून रोजी झालेल्या आत्महत्येने खळबळ उडवली आहे. तिच्या चुलत भावाने सुशांत सिंह राजपूतच्या 14 जून रोजीच्या मृत्यूशी संचिताचा संबंध जोडला आहे. इन्स्टाग्राम पोस्टमधून हे कनेक्शन समोर आल्याचा दावा त्याने केला आहे. इंडस्ट्रीतील दबाव आणि धमक्यांमुळे संचिताने हे पाऊल उचलले असल्याचा गंभीर आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे.

अत्यंत कठोर मेहनतीने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या संचिता उगलेने आयुष्य संपवलं आहे. रविवार 14 जून 2026 रोजी तिने नालासोपाऱ्यातील आचोले गावातील घरी गळफास घेतला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. या घटनेनंतर चुलत भावाने बहिणीच्या मृत्यूवर मोठा दावा केला आहे. त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संचिताच्या मृत्यूचं कनेक्शन जोडलं आहे.
संचिताचा चुलत भाऊ आकाश सतीश उगलेने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने गंभीर आरोप केला. संचिताने काल 14 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता आत्महत्या केली. कालपासून आमचे सर्व सोपस्कार सुरू आहेत. पोस्टमार्टम, केस वगैरे आणि पंचनामा वगैरे…माझा एक भाऊ आहे, त्याने मला एक इन्स्टा आयडी पाठवली. त्यावर संचिताचा प्रोफाईल फोटो लावलेला आहे. इन्स्टाग्राम आयडीचं नाव आहे – edit_.by_.riyuu.
कनेक्शन जोडलं
या इन्स्टा आयडीवर एक रील अपलोड करण्यात आली आहे. त्यात सुशांत सिंह राजपूतची क्लिप्स आहे. त्यावर लिहिलंय “It’s again 14th June (पुन्हा 14 जून).” याचा अर्थ सुशांतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. बरोबर? संचितानेही काल 14 जून 2026 रोजी आत्महत्या केली. त्याने संचिताला पोस्ट केलंय. त्यात कॉन्टेक्स्टमध्ये लिहिलंय “It’s again 14th June (पुन्हा 14 जून).” आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय “We miss you, Sushant sir आम्हाला तुमची आठवण येते सुशांत सर.” सोबत एक रडण्याची आणि हार्टब्रेकची इमोजी आहे.
बहिणीचा आयडी
संचिताचा चुलत भाऊ म्हणाला, याचा अर्थ स्पष्ट आहे की ही माझ्या बहिणीची आयडी आहे. त्यावर माझ्या बहिणीचा प्रोफाईल पिक्चर लागलेला आहे. या आयडीवर 2 जून रोजी पहिली पोस्ट अपलोड करण्यात आली होती. याचा अर्थ आयडी नुकतीच तयार करण्यात आलेली आहे. माझ्या बहिणीने आत्महत्या केली. पण ती खूप घाबरली. का? कारण इंडस्ट्री सर्व काही दाबून टाकते. धमकी देते. सुशांत सिंह राजपूतचं तसंच केलं. त्याला कमकुवत करून टाकलं होतं.
इंडस्ट्रीवर गंभीर आरोप
आकाश सतीशने दावा केला की, यात मोठमोठ्या लोकांचे हात आहेत. हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण ते काय आहे, अल्टिमेटली पॉवर गेम सुरू आहे देशात. आमच्या सारख्या मिडल क्लास फॅमिलीतून ज्या मुलं मुली वर येतात, त्यांना दाबून टाकलं जातं. या घटनेची दखल भारत सरकारने घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती मुर्मू, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही या गोष्टीची गंभीर दखल घ्या. कारण काळे कारनामे करणाऱ्या इंडस्ट्रीत आता माझी बहीण नाहीये.
