हिंदी भाषेच्या सक्तीबद्दल सयाजी शिंदे स्पष्टच म्हणाले.., “मुख्यमंत्री कोणत्या भाषेत..”
राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद सुरू असताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपलं बेधडक मत मांडलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा निर्णय मागे घेण्याची विनंतीसुद्धा केली आहे. पाचवी, सहावी किंवा सातवीनंतर ती भाषा सक्तीची करा, असंही त्यांनी सुचवलंय.

विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून वाद सुरू आहे. राज्यात पहिल्या इयत्तेपासून तिसऱ्या भाषेचं शिक्षण अनिवार्य करतानाच ही भाषा हिंदीच राहील, असं शुद्धिपत्रक राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा जारी केलं. अन्य भाषांच्या शिक्षणासाठी अटींचे अडथळे ठेवतानाच शिक्षण विभागाने अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती केली. तर हिंदी भाषा सक्तीची करू नये, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी हिंदी भाषा सक्तीचं करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं मत मांडलं आहे.
“हिंदी भाषा सक्तीचं करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, असंवेदनशील, अशास्त्रीय आहे. मी आज जो कोणी आहे, तो माझ्या मराठी मातृभाषेमुळे आहे. माझ्या आईची भाषा मराठी, माझ्या गावाची भाषा मराठी, माझ्या तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची भाषा मराठी आहे. हिंदी भाषा लहानपणापासून शिकायची सक्ती कशासाठी? मी मराठीचा ग्रॅज्युएट असून मराठीतूनच शिक्षण पूर्ण केलंय. मराठीइतकं समृद्ध वाङमय दुसऱ्या भाषेत नाही. काहीही असो, पण हा निर्णय मागे घ्या. मुख्यमंत्र्यांना आणि भाषा सक्ती करणाऱ्या कमिटीच्या सदस्यांना ही नम्र विनंती आहे की, हिंदीची सक्ती नको. हा निर्णय मागे घ्या”, असं ते म्हणाले.
“ज्यांनी त्यांनी आपल्या राज्याच्या राज्यभाषेला महत्त्व द्यावं. त्याच्याबद्दल आदर आहे, परंतु तो लादायला नको. पाच-सहा वर्षांच्या मुलाला मराठीची शब्दरचना, वाक्यरचना समजून घेण्याआधीच त्याच्यावर हिंदी लादणं चुकीचं आहे. जरी हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी मला पटत नाही. या गोष्टीला गावा-गावामध्ये सर्वांनी विरोध करायला हवा. ही सक्ती पाचवी-सहावी-सातवीनंतर करा. मी बारा भाषेत काम करतो, मात्र लिहून घेताना ते मराठीतच लिहून घेतो. मग ते समजून घेतो. ज्या मातृभाषेत आपण शिकतो, त्याच मातृभाषेने आपण विचार करतो. ही हिंदी भाषा लादून त्याचं भजं करू नका,” असं स्पष्ट मत सयाजी शिंदेंनी मांडलंय.
याबाबत मराठी कलाकार पुढाकार घेऊन का बोलत नाही, असं विचारलं असता ते म्हणाले, “हिंदी भाषेच्या सक्तीबाबत मराठी कलाकार जरी समोर येत नसले तरी मी त्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून बोलतो. हिंदी भाषेची सक्ती नको. भारतात मराठी भाषा श्रेष्ठ आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांची स्थिती खूप वाईट आहे. लहानपणी आम्हाला देखील इंग्लिश येत नाही म्हणून हिणवलं जायचं. पण माझा अॅटीट्यूड वेगळा होता. मराठीनेही आपल्या ग्रामीण भाषेची वाट लावली. साठ वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांनी जे मला शिकवलं ते मला आता योग्य वाटतं. त्यांच्याकडे शील अश्लीलता नव्हती. जातीपातीतले भेद नव्हते. अलीकडे इंग्रजी भाषेमुळे हे सर्व बदलत गेलं.”
“घटनेनुसार हिंदी भाषा राष्ट्रभाषा नाही. एखाद्या पक्षाचा तो अजेंडा असू शकतो. घटनेनुसार मुख्य 18 भाषा या राष्ट्रभाषा आहेत. ज्याने त्याने आपल्या राज्यभाषेला आदर द्यायला हवा, पण तो लादायला नको. मुख्यमंत्री नेमके कोणत्या भाषेत शिकलेत हे मला समजत नाही. मराठीतच शिकलेत ना? त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. तिसरी सक्तीची भाषा नको. आई-बाबांनी आपण शिकलेली मराठी भाषा पहिली मुलांना शिकू द्यावी. त्यानंतर त्यांना कितीही भाषांचं ज्ञान द्यावं,” असं परखड मत सयाजी शिंदेंनी मांडलं आहे.
