कुर्ता फाडला, फरफटत नेलं, अब्रुच लुटल्यासारखं वाटलं..; शबाना आझमी भावूक

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी 'बंटवारा 1947'मधील एका दृश्याच्या चित्रीकरणाचा प्रसंग सांगितला. तो सीन शूट करताना मला सर्वांत अपमानास्पद वाटल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. त्या नेमकं काय म्हणाल्या, ते जाणून घ्या..

कुर्ता फाडला, फरफटत नेलं, अब्रुच लुटल्यासारखं वाटलं..; शबाना आझमी भावूक
शबाना आझमी, सनी देओल
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 30, 2026 | 10:24 AM

अभिनेता सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सनीसोबत त्याचा मुलगा करण देओल, प्रिती झिंटा, अली फजल आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. तर आपल्या दमदार अभिनयाने ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात त्या चित्रपटातील एका सीनविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. तो माझ्या करिअरमधील सर्वांत आव्हानात्मक सीन होता, असं त्यांनी सांगितलं. तो सीन करताना मला अत्यंत अपमानास्पद वाटलं, जणू कोणी माझी अब्रूच लुटत आहे, अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला. यावेळी शबाना आझमी भावूकसुद्धा झाल्या होत्या.

‘बंटवारा 1947’ या चित्रपटात एक असं दृश्य आहे, ज्यामध्ये शबाना आझमींच्या पात्राचं शोषण केलं जातं. खलनायक त्यांचा कुर्ता फाडतो आणि त्यांना दुपट्ट्याने फरफटत नेतो, असा हा सीन आहे. या सीनची झलक ट्रेलरमध्येही पहायला मिळते. शबाना आझमी म्हणाल्या, त्यांच्या पात्राच्या भावनांपासून स्वत:ला दूर करणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. “त्या दृश्यामुळे मला क्षणभर अत्यंत हतबल आणि असुरक्षित वाटलं. या चित्रपटात एक असं दृश्य आहे, जिथे एका माणूस म्हणून मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. जणू मी माझी सगळी प्रतिष्ठाच गमावली आहे, असं मला वाटलं. जेव्हा खलनायक मला खेचून नेतो, माझा कुर्ता फाडतो, तेव्हा त्याक्षणी एक माणूस म्हणून मला प्रचंड हतबल आणि असहाय्य वाटलं होतं. त्यानंतर जेव्हा सनी देओलने येऊन माझ्यावर दुपट्टा घातला, तेव्हा तो फक्त भूमिकेच्या रुपातच नाही, तर खऱ्या आयुष्यातील मुलाच्या रुपात माझा रक्षक बनला. मी त्याला मनापासून मिठी मारली आणि म्हणाले, तो मला तिथे वाचवायला होता, यासाठी मी देवाचे आभार मानते”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.

‘बंटवारा 1947’ या चित्रपटाची कथा भारताच्या फाळणी आणि पंजाबच्या विभाजनाच्या काळातली आहे. या चित्रपटात अभिमन्यू सिंह, खुशी हजारे आणि कनिका कपूर यांच्याही भूमिका आहेत. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us