त्याच्या मृत्यूने सर्वकाही बदललं, निरागसता हरपली..; सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलताना शहनाजला भावना अनावर
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या चार वर्षांनंतर अभिनेत्री शहनाज गिल त्याच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. सिद्धार्थनंतर आयुष्य कसं बदललं, याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. मी आधीसारखी नाही राहिले, असं शहनाज म्हणाली.

‘बिग बॉस 13’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या ‘इक कुडी’ या पंजाबी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत शहनाज तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सिद्धार्थ गेल्यानंतर मी पूर्णपणे बदलली, आता मी पहिली शहनाज नाही राहिले, असं ती म्हणाली. 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं होतं. त्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर आले होते, ज्यामध्ये शहनाज ढसाढसा रडताना दिसून आली होतती. आता नुकत्याच दिलेल्या या मुलाखतीत शहनाजने सिद्धार्थच्या निधनाचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, याविषयी सांगितलं.
शहनाजने रणवीर अलाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तिने सांगितलं की, सिद्धार्थच्या अचानक जाण्याने तिला पूर्णपणे बदललंय. मी माझी निरागसता गमावली आहे, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. शहनाज आणि सिद्धार्थ हे ‘बिग बॉस 13’मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. सुरुवातीला या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. परंतु हळूहळू त्याचं मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर झालं होतं. या दोघांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडायची. चाहत्यांनी त्यांना ‘सिदनाज’ असं टोपणनाव दिलं होतं.
View this post on Instagram
“सिद्धार्थ मला खूप परिपक्व बनवून गेला. हे सर्व घडल्यानंतर मी आणखी परिपक्व झाले आहे. नाहीतर मी अजूनही तीच बिग बॉस गर्ल असते, जिला कोणाचीही पर्वा नव्हती, काहीही नाही. बिग बॉस 13 मध्ये लोकांनी ज्या शहनाजला पाहिलं होतं, तिने आयुष्यात खूप संघर्ष केला होता. परंतु सिद्धार्तच्या मृत्यूनंतर तिने जे गमावलं, त्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. मी आधी खूप निश्चिंत, आनंदी, मनमौजी होते. पण तो गेल्यानंतर माझी निरागसताच हरवली आहे”, असं शहनाज म्हणाली.
शहनाजने पुढे सांगितलं की ती अनेकदा बिग बॉसच्या प्रवासातील व्हिडीओ, इन्स्टाग्राम रील्स पाहते. ते पाहून मी किती पुढे आले आणि किती बदलले, याचं मला खूप आश्चर्य वाटतं, असं ती म्हणाली. “कधीकधी मी त्या रील्सकडे पाहते आणि विचार करते की, मी कशी होते? मी खरंच अशी होती का? आयुष्याने मला खूप बदललंय. ती मुलगी वेगळी होती. सहज आणि आनंदी होती. मला माझ्या भावनांनीही खूप बदललंय. मला बिग बॉसनंतर चंदीगडला परत जायचं होतं. पण सिद्धार्थने मला मुंबईत थांबवलं होतं. त्याने इथे माझी सर्व व्यवस्था केली होती. त्यावेळी मला मुंबईबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी स्वत:वर काम केलं, स्वत:ला सुधारलं आणि माझं करिअर पुन्हा सुरुवातीपासून घडवलं. याचं सर्व श्रेय सिद्धार्थलाच जातं”, अशा शब्दांत शहनाज व्यक्त झाली.
