शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस’मध्ये गेल्यानंतर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्रीने सांगितलं कारण
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर बिग बॉसच्या घरात असताना तिचा भावोजी आणि तेलुगू सुपरस्टार महेश बाबूने सोशल मीडियावर तिला पाठिंबा देण्यासाठी कोणतीच पोस्ट का लिहिली नाही, असा सवाल अनेकांनी केला. त्यावर आता शिल्पाने मौन सोडलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर जवळपास 100 हून अधिक दिवस ‘बिग बॉस 18’च्या घरात राहिली. या संपूर्ण प्रवासादरम्यान तिला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. शिल्पा ही अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण असून साऊथ सुपरस्टार महेश बाबू तिचा भावोजी आहे. शिल्पा बिग बॉसच्या घरात असताना महेश बाबूने तिला पाठिंबा देणारी एकही पोस्ट कधीच का पोस्ट केली नाही, असा सवाल अनेकांनी केला होता. कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर पाठिंबा मिळाला असला तरी शिल्पा बिग बॉसच्या घरात आणखी काही काळ टिकली असती, असंही मत काहींनी नोंदवलं होतं. यावर अखेर शिल्पाने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं आहे.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, “सोशल मीडियावर किती आणि कसे पोस्ट शेअर केले यावरून नात्याचं मोजमाप करू नये. शिल्पा शिरोडकर म्हणून माझं वैयक्तिक जे अस्तित्व आहे, त्यासोबत मी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. तिथे मी नम्रताची बहीण किंवा महेश बाबूची मेहुणी म्हणून खेळायला गेले नव्हते. अर्थात तो सुपरस्टार आणि प्रचंड लोकप्रिय आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो माझ्या करिअरचाही भाग बनावा. महेश आणि नम्रता हे दोघं सोशल मीडियावर फारसे व्यक्त होत नाही. त्यांना त्यांचं खासगीपण जपायला आवडतं. लोकांनी लगेच त्यांना उद्धट, गर्विष्ठ असं म्हटलं. महेश मितभाषी आहे पण स्वभावाने तो खूप चांगला आहे. त्याला त्याच्या आयुष्यात कोणीही ढवळाढवळ केलेली आवडत नाही, पण जेव्हा कधी काही गरज लागते, तेव्हा तो नेहमी मदतीसाठी उभा असतो.”




View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात जाण्यावरून बहीण नम्रतासोबतही शिल्पाचे वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चा फेटाळत शिल्पा पुढे म्हणाली, “नम्रता माझ्यासोबत हैदराबादला असतानाच मी बिग बॉसची ऑफर स्वीकारली होती. तिने बऱ्याच गोष्टींमध्ये समन्वय साधला होता. ज्याप्रकारे मी सिताराला (नम्रताची मुलगी) काहीही म्हणू शकते आणि मावशी म्हणून ज्याप्रकारे माझं तिच्याशी नातं आहे, तसंच नातं नम्रताचं माझ्या मुलीसोबत आहे. त्यामुळे मी बिग बॉसच्या घरात असताना मुलगी अनुष्काची काळजी तिनेच घेतली. माझ्या कुटुंबीयांना माझ्यावर खूप अभिमान आहे. बिग बॉसच्या घरात मी इतके दिवस टिकले, याचं त्यांना खूप कौतुक वाटतं.”