शिवानी सोनारच्या आयुष्यात 2025 मध्ये घडल्या या दोन अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी
'तारिणी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री शिवानी सोनारसाठी 2025 हे वर्ष अविस्मरणीय ठरलं आहे. कारण यावर्षी तिच्यासोबत दोन महत्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. तर नवीन वर्षासाठी काय संकल्प असेल, याबद्दलही तिने सांगितलं.

झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ मालिकेत झळकणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने 2025 या सरत्या वर्षातल्या तिच्या खास आठवणी आणि अनुभव शेअर केले आहेत. शिवानीसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरलं. शिवानी म्हणाली, “2025 माझ्यासाठी खूप खास आहे. जानेवारी 2025 मध्ये माझं लग्न झालं आणि माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत माझ्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली. लग्नानंतर जीवनात बरेच बदल होतात आणि माझ्या बाबतीत हे सर्व बदल सकारात्मक होते. कुटुंबापासून दूर राहण्याची सवय नव्हती. तर ती गोष्ट माझ्यासाठी नवीन आहे. मी नक्कीच माझ्या कुटुंबाला खूप मिस करते. माझा धाकटा भाऊही यावर्षी कामासाठी बेंगळुरूला गेला. पहिल्यांदाच तो माझ्यापासून दूर आहे, पण तो त्याचं करिअर बनवतोय, आयुष्यात पुढे जात आहे हे बघून मला आनंदही आहे.”
व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, “या वर्षी मला ‘तारिणी’ ही नवीन मालिका मिळाली. मी साकारत असलेलं पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. झी मराठी आणि निर्मिती संस्थेसोबत हे माझं पहिलंच असोसिएशन आहे. संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा मला खूप आनंद मिळतोय. 2025 मधील अविस्मरणीय क्षणांपैकी एक सांगायचं झालं तर माझं लग्न आणि माझी ‘तारिणी’ मालिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भलीमोठी लागलेली होर्डिंग्स. मी अतिशय आनंदी होती ते पाहून.”
View this post on Instagram
2025 यावर्षी आरोग्याकडे पुरेसं लक्ष देता न आल्याची खंतही शिवानीने यावेळी व्यक्त केली. “पुढील वर्षात व्यायाम, झोप आणि एकूणच दिनचर्या सुधारण्याचं ठरवलं आहे. हे सध्या ‘वर्क इन प्रोग्रेस’ आहे. 2025 तू माझं आयुष्य सकारात्मक केलंस. दरवर्षी मी कुटुंब-मित्रपरिवारासोबत नववर्ष साजरं करते. पण यंदा कदाचित मी ‘तारिणी’च्या शूटवर असेन. तरीही शूट सांभाळून माझ्या प्रियजनांसोबतच मी नवीन वर्षाचं स्वागत करेन,” असं तिने सांगितलं.
‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली. यावर्षी जानेवारी महिन्यात तिने अंबर गणपुळेशी लग्न केलं. या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
