Sona Mohapatra : आमचा सुपरस्टार दोन पेग घेऊन…सलमान खानवर प्रसिद्ध गायिकेचा निशाणा; 10 वर्षांपूर्वीचा वाद पुन्हा चर्चेत
Singer On Salman Khan : प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रानं सलमान खानवर पुन्हा निशाणा साधला आहे. काय म्हणाली गायिका? जाणून घ्या.

गायिका सोना मोहपात्रानं पुन्हा एकदा सलमान खानवर निशाणा साधला आहे. यावेळी तिनं सलमानच्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील ‘तेरी सेक्सी ब्युटी’ या गाण्यावर टीका केली आहे. तसंच तिनं सलमानसोबतचा 10 वर्षे जुना वाद, बॉलिवूडमधील तिची कारकीर्द आणि त्याच्या विरोधात बोलण्याची किंमत यावर भाष्य केलं आहे.
काय म्हणाली सोना मोहपात्रा?
सोनानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोना उपहासानं म्हणाली, ‘आमचा सुपरस्टार दोन पेग घेऊन विमान बनण्याबद्दल बोलत आहे. हेच ते कलात्मक जग आहे का ज्याच्या मी चुका दाखवत होते. जर मी अशी आणखी १० गाणी केली असती, तर माझं आयुष्य यशस्वी झालं असतं.’
जर ती सलमान खानसोबतच्या वादात अडकली नसती, तर तिची बॉलिवूड कारकीर्द खूप मोठी झाली असती, असं म्हणणाऱ्यांना सोनानं प्रत्युत्तर दिलं. सोना म्हणाली की, लोक तिला अनेकदा सांगायचे की, ती प्रतिभावान आहे, पण सलमानसोबतच्या वादामुळे तिनं तिच्या करिअरच्या संधी गमावल्या. सोनानं उत्तर दिलं, ‘माझ्या गमावलेल्या बॉलिवूड कारकिर्दीबद्दल शोक व्यक्त करू नका. मी माझं आयुष्य व्यवस्थित जगत आहे.’
View this post on Instagram
2016 च्या वादाची आठवण करून देताना, सोनानं खुलासा केला की, सलमानच्या बलात्कारावरील टिप्पणीवर टीका केल्यानंतर तिला सामूहिक बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. तिचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले आणि तिच्या कुटुंबालाही शिवीगाळ आणि धमक्यांना सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे तिला पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली.
दरम्यान, सोना मोहपात्रा आणि सलमान खान यांच्यातील वाद जवळपास 10 वर्षांपूर्वी, 2016 मध्ये सुरू झाला होता. याचं कारण सलमान खानचं एक वक्तव्य होतं, ज्यामुळे बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत महिलांचा सन्मान आणि संवेदनशीलतेवर चर्चा सुरू झाली. सलमानच्या वक्तव्यावर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांमध्ये सोनासुद्धा होती. ही संपूर्ण घटना जून 2016 मध्ये घडली. त्यावेळी सलमान खान त्याच्या ‘सुलतान’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. त्यानं या चित्रपटात एका पैलवानाची भूमिका साकारली होती आणि यासाठी खूप शारीरिक श्रमाची गरज होती. एका मुलाखतीदरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगबद्दल विचारलं असता, त्यानं आपली अवस्था बलात्कार झालेल्या पीडितेसारखी झाली असल्याचं म्हटलेलं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला.
