
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रेमकहाणी आज सुफळ संपूर्ण होणार. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिवसाचीवाट बघत होते, अखेर तो आज आलाच आहे. आज 23 जून आहे आणि आजच दोघेही लग्न करणार आहेत. सोनाक्षी आणि झहीर या दोघांचेही धर्म भिन्न आहेत. मात्र त्या दोघांनीही ठरवले आहे की हिंदू किंवा इस्लाम धर्माच्या प्रथा आणि परंपरांनुसार लग्न करणार नाही, तर दोघेही कायद्यासमोर एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतील. म्हणजे दोघेही रजिस्टर मॅरेज करणार आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचं रजिस्टर मॅरेज हे जहीरच्या घरीच होणार आहे. लग्नासाठी सोनाक्षी तिच्या घरातून निघाली आहे, अशी माहिती मिळाली आहे. जहीरचं घर वांद्रे येथे आहे. दोघेही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र-मैत्रिणी, आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतील. स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत दोघांचे लग्न होणार आहे. अशा परिस्थितीत दोघांनीही धर्म बदलण्याची गरज नाही.
घरीच होऊ शकतं रजिस्टर मॅरेज ?
तज्ज्ञांच्या मते, एखादं जोडपं त्यांच्या घरीही कोर्ट मॅरेजची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी जास्तीत जास्त 60 दिवस आणि लग्नाच्या तारखेच्या किमान 30 दिवस आधी संबंधित विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो. त्यामध्ये त्या जोडप्याला अर्जामध्ये सूचित करावे लागते की त्यांना लग्नाची नोंदणी प्रक्रिया (रजिस्ट्रेशन) घरीच पूर्ण करायची आहे. एवढंच नव्हे तर ज्यांचं लग्न आहे, त्या जोडप्याला रविवारी लग्न असेल तर त्यासंबंधीही न्यायालयाला विनंती करावी लागते. यानंतर कोर्टाकडून लग्नाची तारीख देण्यात येते. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर घरच्या घरी लग्न करण्यासाठी जोडप्याला काही अतिरिक्त शुल्क भरावे लागते. यानंतर कोर्टाचा ऑफिसर घरी येतो आणि कोर्ट मॅरेजची प्रक्रिया केली जाते. घरात लग्नाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात.
सोनाक्षी-जहीरच्या लग्नानंतर शानदार रिसेप्शन
सोनाक्षी आणि जहीर हे त्यांच्या रजिस्टर लग्नानंतर ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. मुंबईतील दादर भागातील बास्टियन रेस्टॉरंटमध्ये मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांचेही रिसेप्शन पार पडणार आहे. हे रेस्टॉरंट अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मालकीचे ते असून 48व्या मजल्यावर आहे. या रिसेप्शनसाठी अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, रेखा, संजय लीला भन्साळी, अदिती राव हैदरी, हुमा कुरेशी असे नामवंत लाकार हजेरी लावणार आहेत. याशिवाय मनीषा कोईराला, सुभाष घई आणि पहलाज निहलानी यांसारखे जवळचे मित्रही रिसेप्शनसाठी उपस्थित राहणार आहेत.