कॅन्सरशी झुंज देणारी सोनाली अखेर मायदेशी परतली

  • Sachin Patil
  • Published On - 8:20 AM, 3 Dec 2018
कॅन्सरशी झुंज देणारी सोनाली अखेर मायदेशी परतली

मुंबई : मागील पाच महिन्यांपासून अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरशी झुंज देणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे अखेर मायदेशी परतली आहे. मध्यरात्री ती मुंबईत दाखल झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याविषयीची माहिती दिली होती. ज्यानंतर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने मुंबई विमानतळावरील सोनालीचे फोटो पोस्ट करत ती मुंबईत परतल्याची माहिती दिली. इतक्या महिन्यांनी मायदेशी परतल्याचा आनंद सोनालीच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. यावेळी तिने विमानतळावर हात जोडून चाहत्यांना अभिवादन केले. यावेळी पती गोल्डी बेहेलसुद्धा तिच्यासोबत होते.


सोनाली विमानतळावर मीडियाशी न बोलता पुढे निघून गेली. मात्र सोनाली यांचे पती गोल्डी बेहेल यांनी मीडियाशी संवाद साधला.

“सोनालीची तब्येत आता ठिक आहे. पण सोनालीवरील उपचार पूर्ण झाले असले तरीही हा आजार कधीही परतू शकतो. त्यामुळे तिची नियमित तपासणी सुरु राहणार आहे. या तपासण्यांसाठी तिला न्यूयॉर्कला जावे लागेल. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि प्रार्थना यांच्यामुळेच सोनाली लवकर बरी होऊ शकली, त्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद.” असे गोल्डी बेहेल यांनी सांगितले.

गेल्या जुलै महिन्यात सोनालीने तिला कॅन्सर असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड केलं होतं. तेव्हापासूनच अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये तिचा उपचार सुरु होता. कॅन्सर या आजाराशी लढणे काही सोपे नाही. पण सोनालीने मोठ्या जीकरीने ही लढाई लढली.

इतके महिने आपल्या देशापासून, आपल्या लोकांपासून दूर राहिल्यानंतर अखेर सोनाली भारतात परतली आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, ती लवकरात लवकर या आजारातून बरी व्हावी अशी प्रार्थना तिचे चाहते करत आहेत.