ख्रिसमस एकत्र साजरा केल्यानंतर नवीन वर्षात पडली वादाची ठिणगी; बोनी कपूरच्या मुलीचं ब्रेकअप
एकत्र ख्रिसमस साजरा केल्यानंतर खुशी कपूर आणि वेदांग रैना यांच्या नात्यात नवीन वर्षात वादाची ठिणगी पडल्याचं समजतंय. दोन वर्षांच्या डेटिंगनंतर या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी 'द आर्चीज'मध्ये एकत्र काम केलं होतं.

बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक नाती तयार होतात आणि काळानुसार ती बदलतात. काहींचं रिलेशनशिप वर्षानुवर्षे टिकून राहतं, तर काहींचं अवघ्या काही महिन्यांत किंवा एक-दोन वर्षातच ब्रेकअप होतो. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूरचं रिलेशनशिप कोणापासून लपून राहिलेलं नाही. अभिनेता वेदांग रैनाला ती गेल्या दोन वर्षांपासून डेट करत होती. हे दोघं कायम एकमेकांसोबत दिसायचे, परंतु आता त्यांच्या नात्यात कायमचा दुरावा आल्याचं कळतंय. वेदांग आणि खुशी यांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर येत आहे. पत्रकार विक्की लालवानीने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
‘सर्वकाही संपलंय. खुशी कपूर आणि वेदांग रैना यांच्या जवळच्या व्यक्तीकडून समजलंय की त्या दोघांचं ब्रेकअप झालं आहे. यामागचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाल्याचं कळतंय. खुशी आणि वेदांगने त्यांच्या नात्याची जाहीर कबुली कधीच दिली नव्हती. परंतु त्यांचं नातं अत्यंत सहजसोपं असल्याची प्रतिक्रिया दोघांनी एका मुलाखतीत दिली होती’, अशी पोस्ट विक्की लालवानीने लिहिली आहे. यावर अद्याप खुशी किंवा वेदांगने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे वेदांगने कपूर कुटुंबीयांसोबत ख्रिसमस साजरा केला होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
View this post on Instagram
‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत वेदांगने ‘सिंगल’ असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु योग्य वेळी ही परिस्थिती बदलू शकते, असंही तो म्हणाला होता. या मुलाखतीत जेव्हा त्याला खुशीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, “आम्ही दोघं क्लोज फ्रेंड्स (खूप जवळचे मित्र) आहोत. माझं तिच्याशी खूप घट्टं नातं आहे. आम्ही बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतो आणि आमच्या बऱ्याच गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत.” तर खुशी कपूरनेही वेदांगला तिचा चांगला मित्र असल्याचं म्हटलं होतं.
खुशी आणि वेदांग यांनी 2023 मध्ये ‘द आर्चीज’मध्ये काम केलं होतं. या चित्रपटात खुशी ही बेट्टी कूपरच्या भूमिकेत होती. तर वेदांग हा रेगीची भूमिका साकारत होता. या चित्रपटातील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतरच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
