सुरू कधी संपलं कधी? अवघ्या 3 महिन्यात प्रसिद्ध मालिकेनं गुंडाळला गाशा, प्रेक्षकांना बसला धक्का!
स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका अवघ्या तीन महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ऑक्टोबर महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता तीन महिन्यांत मालिका गाशा गुंडाळत असल्याचं समजल्यावर प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.

छोट्या पडद्यावरील काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. तर काही मालिका अवघ्या काही महिन्यांतच आपला गाशा गुंडाळतात. यामागे टीआरपी न मिळणं किंवा मालिकेला अपेक्षित असा प्रतिसाद न मिळणं किंवा काही वेळा अंतर्गत राजकारण यांसारखी कारणं असतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेसोबत सध्या असंच काहीसं घडलंय. अवघ्या तीन महिन्यांत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ऑक्टोबर महिन्यात ही नवी मालिका सुरू झाली होती. या मालिकेचं नाव आहे ‘काजळमाया’. वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती. यामध्ये अक्षय केळकर आणि नवोदित अभिनेत्री रुची जाईल यांच्या मुख्य भूमिका होत्या. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रवाह वाहिनीवर काही नव्या मालिकांची घोषणा झाली. त्याचसोबत ‘काजळमाया’ प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं समजलं.
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘तुझ्या सोबतीने’ ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. रात्री 9 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे याच वेळेत प्रसारित होणारी ‘नशीबवान’ ही मालिका बंद होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु आता वेगळीच माहिती समोर आली आहे. ‘नशीबवान’ नाही तर ‘काजळमाया’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 27 ऑक्टोबर 2025 रोजी ही मालिका सुरू झाली होती. ‘काजळमाया’चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये वालावलकर घराणं शापातून मुक्त होणार असं आभा म्हणते. त्यानंतर अमृत स्वामी आरुषला सांगतात की, कुटुंब नक्षत्र लागलंय, होऊ दे या अभद्राचा नाश. आरुष आणि आभा दोघं मिळून पर्णिका आणि कनकदत्ता यांच्या अंगावर अमृत स्वामींनी दिलेली पावडत टाकताच दोन्ही चेटकिणींचा कायमचा अंत होतो. ‘पर्णिका आणि कनकदत्ताचा होणार कायमचा अंत.. अंतिम भाग’ असं कॅप्शन लिहित हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
‘काजळमाया’ ही मालिका येत्या 11 जानेवारी रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका संपल्यानंतर रात्री 9 वाजता ‘तुझ्या सोबतीने’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. तर ‘नशीबवान’ या मालिकेच्या बदललेल्या वेळेबाबत अद्याप वाहिनीकडून कोणतीही घोषणा झाली नाही.
