मराठी म्हणजे हिंदू नाही काय? ठाकरे बंधूंचा भाजपला खरमरीत सवाल
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची धडाकेबाज मुलाखत पार पडली. भाजपच्या हिंदू महापौर विधानाचा समाचार घेत, मराठी माणूस हिंदू नाही का? असा सवाल ठाकरे बंधूंनी यावेळी उपस्थित केला.

महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौर कोण होणार यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. ठाकरे बंधूंकडून मराठी माणूस महापौर होणार, अशी ग्वाही देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपसह महायुतीने हिंदू महापौर होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत महापालिका निवडणुकीसाठी युती केली आहे. या निमित्ताने संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी या दोन्ही नेत्यांची एक धडाकेबाज संयुक्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत दोन्ही नेत्यांनी भाजपच्या हिंदू महापौर या दाव्याचा चांगलाच समाचार घेतला.
त्यांना मराठी माणूस हा हिंदू वाटत नाही का?
या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपकडून वारंवार होणाऱ्या मुंबईचा महापौर हिंदू होईल या विधानाचा समाचार घेतला. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की मुंबईचा महापौर मराठीच होईल. पण भाजप त्याला हिंदू रंग देऊन मराठी माणसांमध्ये फूट पाडत आहे. जर भाजप म्हणतेय की महापौर हिंदू होईल, तर मग त्यांना मराठी माणूस हा हिंदू वाटत नाही का? हा मराठी अस्मितेचा अपमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी माणूस हिंदू आहे की नाही?
यावर राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली. भाजपला नेमका कोणता हिंदू अपेक्षित आहे? जो मराठी बोलतो तो हिंदू नाही का? देवेंद्र फडणवीसांनी एकदा स्पष्टच करावं की त्यांच्या व्याख्येनुसार मराठी माणूस हिंदू आहे की नाही? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
या मुलाखतीदरम्यान ठाकरे बंधूंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख केला. मोरारजी देसाई हे देखील हिंदू होते, पण त्यांनीच १०७ मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. भाजपला तो इतिहास मान्य आहे का? जेव्हा गुजरात दंगलींनंतर अटलबिहारी वाजपेयी हे नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या तयारीत होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीच पुढाकार घेऊन मोदींना वाचवले होते. बाळासाहेब अस्सल मराठी होते आणि त्यांचे हिंदुत्व हे पोकळ नव्हते, असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईच्या सत्तेची चावी पुन्हा एकदा मराठी माणसाच्याच हातात
यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येण्याबद्दल विचारले असता त्या दोन्ही नेत्यांनी सांगितले की, मुंबईला लुटण्याचे आणि मराठी माणसाला शहराबाहेर काढण्याचे कारस्थान दिल्लीतून रचले जात आहे. हे थांबवण्यासाठी आम्ही आमचे मतभेद बाजूला सारले आहेत. आता मुंबईच्या सत्तेची चावी पुन्हा एकदा मराठी माणसाच्याच हातात असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
