हे सर्व ससाणे, मालकाच्या हातावर बसून… राज ठाकरेंचा घणाघात; वाढत्या लोंढ्यांवरूनही सरकारवर डागली तोफ
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली असून, सत्ताधारी दिल्लीचे 'ससाणे' असल्याची घणाघाती टीका या मुलाखतीत करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. तर दुसरीकडे सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते सध्याच्या राजकीय परिस्थितीपर्यंत अनेक विषयांवर खळबळजनक भाष्य केले.
या मुलाखतीत संजय राऊत यांनी मुंबईतील मोक्याच्या जागा एका विशिष्ट उद्योगपतीला दिल्या जात असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रातील सत्ताधारी हे केवळ ससाणे असून ते दिल्लीच्या आदेशावरून राज्यातील जमिनी उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राजकारण्यांची तुलना ससाण्यांशी केली.
त्यांचे मालक दिल्लीत बसले आहेत
हे सगळे ससाणे आहेत. मालकाच्या हातावर बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं. तसंच आज सत्तेत बसलेले लोक दिल्लीतील मालकांच्या हातावर बसून आपल्याच माणसांना फोडण्याचे काम करत आहेत. स्वकीयांचा घात करणं हे केवळ पक्षांमध्येच नाही, तर सध्याच्या राजकारणाचे मुख्य सूत्र बनले आहे, अशी टीका त्यांनी केली. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी गटावर जोरदार हल्ला चढवला. भलेही ते मराठी असतील, पण त्यांचे मालक दिल्लीत बसले आहेत. ते त्यांच्याकडे नोकरी करत आहेत, ते केवळ गुलाम आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
त्यांची हिंमत वाढली आहे
यावेळी राज ठाकरे यांनी वाढत्या स्थलांतरावर चिंता व्यक्त करताना सांगितले की, उत्तरेतून दररोज जवळपास ५६ ट्रेन भरून महाराष्ट्रात येत आहेत. ठाणे जिल्ह्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, ८-९ महानगरपालिका असलेला हा जगातील एकमेव जिल्हा आहे. ही वाढती लोकसंख्या केवळ रोजीरोटीसाठी नाही, तर राजकीय वर्चस्व गाजवण्यासाठी येत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, अशी भाषा वापरण्यापर्यंत त्यांची हिंमत वाढली आहे, ही धोक्याची घंटा असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे स्वप्न पाहणारे लोकच आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी जी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आज पुन्हा निर्माण झाली आहे. जर मुंबई महानगरपालिकेतही हेच लोक सत्तेत आले, तर मराठी माणूस हतबल होईल. हा धोका ओळखूनच आम्ही एकत्र आलो आहोत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
