8, 9 आणि 10 जानेवारीला मोठा इशारा, अलर्ट जारी, थेट देशासह राज्यात…
Maharashtra Weather Update : राज्यासह देशात कडाक्याचा गारठा पडला आहे. पुढील काही दिवसात थंडी अधिक तीव्र होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. गारठा वाढला असून पुढील काही दिवसात थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पहाटेच्यावेळी पारा घसरताना दिसतोय. मुंबईसह राज्यात अनेक भागात पारा खाली घसरल्याचे आकेडवारीवरून दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस थंडीची तीव्रता राहिल. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडल्याने राज्यात शीतलहरी येत आहेत. दिल्लीमध्ये तीव्र थंडीची लाट आहे. दिवसाही थंड वाऱ्यांमुळे हुडहुडी भरत आहे. सूर्य क्वचितच दिसत आहे. वाढत्या थंडीसोबतच वायू प्रदूषणातही प्रचंड वाढ झालीये. वाढत्या प्रदूषणाचा फटका आरोग्याला बसत आहे. दिवसेंदिवस मुंबईसह अनेक शहरातील हवा घातक बनत चालली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण झाल्या असून श्वसनाच्या समस्याही निर्माण होत आहेत. अशातच डॉक्टरांकडून सल्ला दिला जात आहे की, मास्कशिवाय घराबाहेर पडणे टाळा.
पुणे शहरातील किमान तापमानामध्ये गेल्या काही दिवसात लक्षणीय रित्या वाढ झाली होती. मात्र, किमान तापमानामध्ये मोठी घट नोंदवण्यात आली आहे तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून नोंदवण्यात आली. पुण्यासह राज्यातही हीच परिस्थिती आहे. पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, सांगली, सातारा भागात सकाळच्या वेळी कडाक्याची थंडी पडत आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा वाढला आहे. राज्यात ढगाळ वातावरणासह पाऊस हजेरी लावत असतानाच थंडीची लाट आली. बिहार, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश या भागात थंडीची तीव्र लाट आली आहे. परभणीमध्ये राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. परभणीत 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे 7 अंश सेल्सिअ, धुळ्यात 7.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 8 ते 9 जानेवारी दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा भागात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. राजस्थानमध्ये 9 ते 12 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येऊ शकते ही लाट अधिक तीव्र असेल. पंजाब, दिल्ली, चंदीगडमध्ये 8 ते 10 जानेवारी दरम्यान कडाक्याची थंडी पडेल. थंडीसोबत धुकेही असण्याची शक्यता आहे.
