भयानक! मराठा आंदोलकांकडून अभिनेत्रीच्या कारवर हल्ला, पोलीस तिथे होते, पण..
अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला. दक्षिण मुंबई भरदिवसा तिच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. आंदोलकांनी पाच मिनिटांच्या अंतरावर दोनदा सुमोनाची गाडी अडवली होती.

मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलक सीएसएमटीत ठाण मांडून बसले असल्याने दैनंदिन प्रवाशांची गैरसोय होत आहे. अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने आता इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. रविवारी दक्षिण मुंबईत मराठा आंदोलकांनी तिची गाडी अडवली होती. ही संपूर्ण घटना अत्यंत अस्वस्थ करणारी होती, असं तिने म्हटलंय. भरदिवसा मुंबईत स्वत:च्याच गाडीमध्ये असुरक्षित वाटल्याचं सुमोनाने सांगितलं.
सुमोना चक्रवर्तीची पोस्ट-
‘आज दुपारी 12.30 वाजता.. मी कुलाबाहून फोर्टला कारने जात होते आणि अचानक एका गर्दीने माझी गाडी अडवली. गळ्यात भगवं उपरणं घातलेली एक व्यक्ती माझ्या गाडीच्या बोनेटवर जोरजोरात हात मारत होती आणि मिश्कीलपणे हसत होती. तो माझ्या गाडीवर त्याचं वाढलेलं पोट दाबत होता. तो माझ्यासमोर नाचू लागला होता आणि त्याचे इतर साथीदार माझ्या गाडीच्या काचेजवळ आले आणि जय महाराष्ट्रच्या घोषणा देत जोरजोरात हसत होते. आम्ही थोडं पुढे गेलो आणि पुन्हा तेच घडलं. पाच मिनिटांच्या अंतराने दोनदा ही घटना घडली. पोलीस नव्हते (आम्ही ज्यांना पाहिलं ते फक्त बसून गप्पा मारत होते.) कायदा आणि सुव्यवस्था नव्हती. दक्षिण मुंबईत भरदिवसा मला माझ्या कारमध्येही असुरक्षित वाटत होतं’ असं तिने लिहिलं.

या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘रस्ते तर केळ्याच्या सालींनी, प्लॅस्टिकच्या बॉटल्सने, कचऱ्याने भरलेले होते. फूटपाथवर चालायला जागा नव्हती. आंदोलनाच्या नावाखाली हे आंदोलक खातायत, पितायत, झोपतायत, रस्त्यावर अंघोळ करतायत, जेवण बनवतायत, शौचालयाला जात आहेत, व्हिडीओ कॉल करत आहेत, रील्स बनवत आहेत आणि मुंबई दर्शन करत आहेत. नागरी कर्तव्यांची पूर्णपणे थट्टा उडवत आहेत.’
View this post on Instagram
‘मी जवळपासून माझं संपूर्ण आयुष्य मुंबईमध्ये राहिलेय. मला इथे आणि खासकरून दक्षिण मुंबईमध्ये नेहमीच सुरक्षित वाटायचं. पण आज, इतक्या वर्षांत पहिल्यांदाच, तेसुद्धा भरदिवसा मला माझ्या कारमध्येही असुरक्षित वाटत होतं. अचानक मला नशिबवान असल्याचं जाणवलं, कारण माझ्यासोबत एक मित्र होता. मी एकटी असते, तर काय झालं असतं याचा मी विचारसुद्धा करू शकत नव्हते. मला व्हिडीओ काढण्याची इच्छा झाली होती, परंतु लगेच जाणवलं की यामुळे त्यांना आणखी ऊत येईल किंवा प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे मी व्हिडीओ काढला नाही’, असं सुमोनाने सांगितलं.
‘तुम्ही कोणीही असाल, कुठेही असाल तरी कायदा-सुव्यवस्था अवघ्या काही सेकंदांत कोलमडू शकते, याची जाणीव होणंच भीतीदायक आहे. आंदोलनं शांतपणे केली जाऊ शकतात. आम्ही यापेक्षा अधिक गरजेच्या कारणांसाठी शांतपूर्ण आंदोलनं पाहिली आहेत. अशीही आंदोलनं पाहिली आहेत, जी पोलिसांकडून दाबली जातात. परंतु इथे? पूर्णतः अराजकता. एक कर भरणारी नागरिक, एक महिला आणि या शहरावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मला खूप अस्वस्थ वाटलं. शासन आणि नागरी जबाबदाऱ्यांची अशा पद्धतीने खिल्ली उडवणाऱ्यांपेक्षा आपण अनेक चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहोत. आपल्या स्वत:च्या शहरात सुरक्षित वाटण्याचा आपल्याला अधिकार आहे’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
