प्राजक्ताच्या लग्नाची तारीख आली समोर; लग्नपत्रिका पाहिलीत का?
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नपत्रिकेचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. प्राजक्ता आणि शंभुराज खुटवड यांचा ऑगस्टमध्ये साखरपुडा पार पडला होता.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत येसुबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ऑगस्ट महिन्यात तिने शंभुराज खुटवडशी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. लग्नपत्रिका पूजनाचा व्हिडीओ प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या लग्नपत्रिकेमुळे प्राजक्ता आणि शंभुराजच्या लग्नाची तारीखसुद्धा चाहत्यांना समजली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हे दोघं विवाहबद्ध होणार असून लग्नाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे.
साखरपुड्याच्या काही दिवस आधी प्राजक्ताने पाहुणे मंडळींसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. तेव्हापासून तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तिने थेट साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले. तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. विशेष म्हणजे प्राजक्ताने ज्या व्यक्तीसोबत साखरपुडा केला आहे, त्याचंही नाव ‘शंभुराज’ असं आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही तिला शुंभराज भेटले आहेत, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.
प्राजक्ताची लग्नपत्रिका-
View this post on Instagram
2 डिसेंबर 2025 रोजी प्राजक्ता आणि शंभुराज लग्नबंधनात अडकणार आहेत. पत्रिकेवरील मुहूर्ताची वेळसुद्धा या व्हिडीओत पहायला मिळतेय. दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनी लग्नाचा मुहूर्त आहे. या व्हिडीओमध्ये लग्नपत्रिका आणि आजूबाजूला हळद-कुंकू, अक्षता, गुलाबाच्या पाकळ्या, मोराचं पिस, राधा-कृष्णची मूर्ती.. अशी खास सजावट पहायला मिळतेय. या लग्नपत्रिकेची डिझाइन अगदी पारंपरिक आहे.
एका मुलाखतीत प्राजक्ताने शंभुराजच्या भेटीचा किस्सा सांगितला होता. “मालिकेत महाराणी येसुबाईंची भूमिका साकारून मी घराघरात पोहोचले. वयाच्या 18 व्या वर्षापासूनच मला स्थळं येण्यास सुरुवात झाली होती. परंतु मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं. आमच्या दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्साच भन्नाट आहे. मी एका शूटिंगसाठी नाईट शिफ्टमध्ये काम करत होती. आमच्या गाडीची आणि एका ट्रकची धडक झाली होती. मी खूप चिडले होते आणि ड्राइव्हरवर भडकून त्याच्या मालकाला बोलवायला सांगितलं होतं. तेव्हा त्याचे मालक हेच (शंभुराज) होते. त्यांनी संपूर्ण परिस्थिती व्यवस्थित हाताळली आणि मला शूटिंगच्या ठिकाणी नेऊन सोडलं. तिथून पुढे आमच्यात चांगली मैत्री झाली.”
प्राजक्ताने इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. परंतु अभिनयाची आवड असल्याने तिने अभिनयक्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. विविध मालिकांमधून तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.
