‘तारक मेहता..’मधील जेठालालच्या ऑनस्क्रीन पत्नीचा घटस्फोट; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का!
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री सिंपल कौल पतीपासून विभक्त होत असल्याची माहिती समोर येत आहे. लग्नाच्या 15 वर्षांनंतर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. याबद्दल खुद्द सिंपल व्यक्त झाली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘सीआयडी’ आणि ‘शरारत’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री सिंपल कौल सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सिंपलने पती राहुल लुंबाला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी नुकताच तिने कोर्टात अर्जदेखील दाखल केला आहे. परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची माहिती तिने दिली आहे. सिंपलने ‘तारक मेहता..’ या मालिकेत जेठालालची पहिली पत्नी गुलाबोची भूमिका साकारली होती. 2010 मध्ये तिने राहुल लुंबाशी लग्न केलं. आता लग्नाच्या 15 वर्षांनंतर हे दोघं विभक्त होत आहेत.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सिंपल म्हणाली, “आम्ही एखाद्या कुटुंबापेक्षाही अधिक आहोत. माझ्या डोक्यात ही गोष्टच येत नाही की आता सर्वकाही संपलंय. कारण मी त्याला इतक्या वर्षांपासून ओळखते. जेव्हा तुम्ही लग्न करता, तेव्हा तुमचा पार्टनर, तुमचं कुटुंब.. हे सर्वकाही तसंच राहतं. विभक्त होण्याचा निर्णय लोक कसं घेतात, ते मला माहीत नाही. मी प्रेमाने जगते आणि माझ्या आयुष्यात मी खूप सारं प्रेम, आनंद आणि अध्यात्मिक जागरुकता घेऊन जगतेय. मला असंच जगायला आवडतं.”
View this post on Instagram
सिंपलने तिच्या घटस्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट केलं नाही. परंतु 2023 मध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं होतं की ती आणि तिचा पती लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. “ते बराच वेळ परदेशातच राहतात. मला कधी कधी त्यांची खूप आठवण येते. परंतु आमच्यात खूप चांगला समजूतदारपणा आहे. आमचं नातं खूप मजबूत आहे. हे सर्व आयुष्यात समतोल साधण्याबद्दलच आहे. जेव्हा तो माझ्यापासून दूर असतो, तेव्हा मी माझ्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रीत करते. त्यामुळे आम्हा दोघांसाठी वर्क-लाइफ बॅलेन्स हा प्रश्न नाही. आम्ही खुश आहोत”, असं तिने स्पष्ट केलं होतं.
सिंपल कौलने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘शरारत’ या मालिकांशिवाय ‘जिद्दी दिल माने ना’, ‘यम है हम’, ‘ओए जस्सी’ आणि ‘दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. ती ‘सीआयडी’, ‘सास बिना ससुराल’ आणि ‘तीन बहुरानियाँ’ यामध्येही झळकली होती. सिंपल ही बिझनेसवुमनसुद्धा आहे. मुंबईत सध्या तिचे सहा रेस्टॉरंट आहेत आणि बेंगळुरूमध्ये एक आहे.
