तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकर यांच्या मैत्रीत फूट? एकमेकींना अनफॉलो केलं अन्..
अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमळेकर या दोघींच्या मैत्रीत फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर अपूर्वामुळेच तेजश्रीने 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडल्याचंही म्हटलं जात आहे. या दोघींनी इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलंय.

अभिनेत्री तेजश्री प्रधानने बऱ्याच काळानंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. यामध्ये अभिनेता राज हंचनाळेसोबतच्या तिच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. सागर (राज हंचनाळे) आणि मुक्ताच्या (तेजश्री प्रधान) या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता. मात्र तेजश्रीने अचानक ही मालिका सोडत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तिने ही मालिका का सोडली, याबाबतचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र तेजश्रीच्या मालिका सोडण्यामागे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर तर कारणीभूत नव्हती ना, असा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. यामागचं कारणंही तसंच आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वाने सावनीची भूमिका साकारली आहे. अपूर्वाची ही भूमिका खलनायिकेची आहे. त्यामुळे मालिकेत अनेकदा सावनी आणि मुक्ता यांच्यामध्ये भांडणं दाखवली गेली आहेत. मात्र आता खऱ्या आयुष्यातसुद्धा तेजश्री आणि अपूर्वा एकमेकांच्या वैरी झाल्या आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. यामागचं कारण म्हणजे तेजश्री आणि अपूर्वाने एकमेकींना इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनफॉलो केलंय. इतकंच नव्हे तर दोघी एकत्र दुबईला फिरायला गेल्या होत्या. त्या ट्रिपचे फोटोसुद्धा दोघींनी इन्स्टाग्रामवरून काढून टाकले आहेत. म्हणूनच तेजश्रीने अपूर्वासोबतच्या वादामुळे मालिका सोडली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
View this post on Instagram
तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. ‘चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्त्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते इतर कोणीही करणार नाही’, असं तिने त्यात लिहिलं होतं. दरम्यान ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आता तेजश्रीची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेनं घेतली आहे. मात्र स्वरदाला प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोय. ‘तेजश्री प्रधान नाही तर मालिका खास नाही’, ‘हे दोघं एकमेकांना शोभून दिसत नाहीत’, ‘तेजश्रीच छान होती पण नवीन कलाकारांचंही स्वागत केलं पाहिजे’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.